अहमदनगर / नगर सहयाद्री : चौघांनी तरूणाला मारहाण करून त्याच्याकडील पाच हजारांची रोकड काढून घेतली. शनिवारी (दि. ३) रात्री साडेदहाच्या सुमारास केडगाव उपनगरातील मिसाळ गल्लीत ही घटना घडली. मुकेश बबन खंदारे (वय ३७ रा. पाटील कॉलनी, केडगाव) असे लुटमार झालेल्या तरूणाचे नाव आहे.
रविवारी त्यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली. सागर धोत्रे, संदीप धोत्रे, काळ्या धोत्रे व लंब्या धोत्रे (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. वडारगल्ली, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी खंदारे हे सुरेश घेमूड (रा. केडगाव) यांच्याकडे मजूर म्हणून काम करतात.
त्यांनी शनिवारी रात्री घेमूड यांच्याकडून कामाचे पाच हजार रूपये घेतले होते. ते पैसे घेऊन केडगावातील मिसाळ गल्लीतून जात असताना साडेदहाच्या सुमारास त्यांच्या ओळखीचे सागर धोत्रे, संदीप धोत्रे, काळ्या धोत्रे व लंब्या धोत्रे यांनी त्यांना अडविले. बाजूला नेत तुझ्याकडे किती पैसे आहे, असे म्हणून मारहाण केली. फिर्यादीच्या खिशातील पाच हजार रूपये काढून घेत अंधारात पळून गेले.