अहमदनगर / नगर सह्याद्री : नुकताच मकरसंक्रात हा सण उत्साहात पार पडला. मकर संक्रातीनिमित्ताने पतंग उडवण्याचा मोठा उत्साह तरुणांमध्ये असतो. परंतु बऱ्याचदा अनेक लोक चायनीज मांजा वापरतात. यामुळे रस्त्याने पायी किंवा मोटार सायकलवर जाणारे, पक्षी हे जखमी होतात.
त्यामुळे त्यावर शासनाने बंदी घातली आहे.तरी काही ठिकाणी त्याची चोरून विक्री केली जाते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस निरीक्षक दिनेश आहेर याना व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना मकरसंक्राती निमित्ताने विशेष मोहिमेचे आयोजन करुन आपआपले पोलीस स्टेशन हद्दीत विक्रीस बंदी असलेला प्लास्टिक, चायना व नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशित केले होते.
त्यानुसार जिल्हाभरात मोहीम राबवण्यात आली. बंदी असणारा मांजा विक्री करणारे इसम व दुकानदारांची माहिती घेऊन तब्बल २७ लोकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा २७६ नग विविध प्रकारचा मांजा व मांजा गुंडाळण्याचे मशिन असा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान मांजा विक्री करणारे दुकानदार यांना शासनाने बंदी घातलेला प्लास्टिक, नायलॉन मांजा विक्री करु नये असे आवाहन करून यापुढे देखील कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला.