अहमदनगर / नगर सह्याद्री : स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल मोबाईल चोर ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून दीड लाखांचे २ आयफोन व १ विवो कंपनीचा फोन जप्त केला आहे. ज्ञानेश्वर तुकाराम जाधव (वय ४३ वर्षे, रा. विणेगांव, जि. रायगड) असे आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी : शुभम कुंडलिक वाफारे (वय २२ वर्षे, रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली होती की, २५ जानेवारीस ट्रान्सपोर्टची गाडी घेऊन मुंबई येथे जात असताना त्यांचा कंटेनर केडगाव बायपास, अहमदनगर या ठिकाणी नादुरुस्त झाला होता. त्यावेळी चोरट्याने फिर्यादी व त्यांचे मित्राचे २ अॅपल कंपनीचे फोन, व १ विवो कंपनीचा फोन चोरून नेला होता.
कोतवाली पोलिसांत या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ संदीप पवार, पोना/रविंद्र कर्डिले, भिमराज खर्स, पोकों/अमृत आढाव आदींचे पथक तयार करुन पथकास आरोपीचा शोध घेण्याबात सूचना देऊन रवाना केले. तांत्रिक विश्लेषणाचे आधारे वरील आरोपीने चोरी केल्याचे समोर आले. पथकाने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी खालापूर, जि. रायगड येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले.