spot_img
अहमदनगरAhmednagar: लाळ्या खुरकूतने शेतकर्‍यांवर पुन्हा संकट

Ahmednagar: लाळ्या खुरकूतने शेतकर्‍यांवर पुन्हा संकट

spot_img

नगर, नेवासा, शेवगाव, संगमनेर, श्रीरामपूरमध्ये प्रादुर्भाव | जनावरे दगावल्याच्या घटना

सुनिल चोभे | नगर सह्याद्री

जिल्ह्यात लंपी पाठोपाठ लाळ्या खुरकूत आजाराने शेतकरी हैराण झाले आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून लाळ्या खुरकुतचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. दुधाला कमी बाजार, पशुखाद्याचे वाढलेले बाजार यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात असतानाच लाळ्या खुरकूत आजारामुळे पशुपालक आणखी अडचणीत सापडला आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून दुधाचे भाव कमी आणि पशुखाद्याचे भाव वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. लाळ खुरकत हा विविध पशूंच्या प्रजातीमध्ये आढळणारा, वेगाने पसरणारा, मोठ्या प्रमाणावर पशूंची हानी करणारा रोग आहे. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे.

विषाणूचा प्रसार कसा होतो?
लाळ खुरकत रोग तोंडखुरी-पायखुरी हा गायवर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या, मेंढ्या, वराह यासारख्या दोन खूर असलेल्या प्राण्यांमधील एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. विषाणूचा प्रसार हवेतून, श्वासोच्छ्वासाद्वारे, पशूंच्या पाण्याची भांडी, शेण, मुत्र, दूध चारा, गव्हाणी, गोठ्यावर येणार्‍या व्यक्ती, वाहने, पाळीव प्राणी, नवीन खरेदी केलेली जनावरे यांच्याद्वारे रोगाचा प्रसार होतो. गावातील जनावरे चराईसाठी आणि पाणी पिण्यासाठी एकत्रित सोडली जातात, त्या ठिकाणी रोगाचा प्रसार वेगाने होतो.

लाळ खुरकत रोगाची लक्षणे काय?
रोगाचे विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर एक ते पंधरा दिवसात रोगाची प्रत्यक्ष लक्षणे दिसू शकतात. पशूंना १०२-१०६ अंश पर्यंत तीव्र ताप येतो. जनावरे चारा खाणे बंद होते, तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते. जिभेवर, हिरड्यावर, तोंडातील आतील भागावर, कासेवर, खुरामध्ये फोड येतात. एक दोन दिवसात हे फोड फुटतात आणि त्या ठिकाणी अल्सर सारखी जखम होते. या जखमांमुळे जनावरांना चारा खाता येत नाही, जनावरे अशक्त होतात.

पशुपालकांनी काळजी घ्यावी
लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर तालुक्यात जनावरांचे लसीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तालुक्यात लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. परंतु, शेतकर्‍यांनी बाजारातून जनावरे आणल्यानंतर आपल्या गोठ्यात न ठेवता १५ दिवस बाहेर ठेवले पाहिजे. त्या जनावरांचे टॅगिंग, लसीकरण करुन घ्यावे.
– एन. बी. धनवडे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी

९० टक्के लसीकरण पूर्ण
जिल्ह्याला १६ लाख लस प्राप्त झाली होती. जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव नेवासा, शेवगाव, संगमनेर, श्रीरामपूरमध्ये आढळून आला आहे. पशुपालकांनी जनावरे लसीकरण करावयाचे राहिल्यास ते संबंधित डॉक्टरांना संपर्क करुन लसीकरण करुन घ्यावे.
– दशरथ दिघे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

रोग प्रतिबंधक उपाय
गोठ्यावर लाळ खुरकत सदृश्य आजार दिसल्यास त्या जनावरांना कळपापासून वेगळे करावे आणि त्याचे चारा पाणी स्वतंत्ररित्या करावे. बाजारातून होणारी जनावरांची खरेदी विक्री हे रोगाच्या प्रसाराचे एक प्रमुख कारण असल्याने बाजारातून नवीन जनावरे खरेदी करु नये. मध, लोणी व नाचणीचे पीठ यांचा लेप तोंडातील व्रणांवर द्यावा. तोंड व पायातील जखमा लवकर बर्‍या होण्याकरिता दोन टक्के खाण्याचा सोडा, १ टक्के पोटशीयम परमंग्नेट किंवा तुरटीच्या एक टक्के द्रावणाने दिवसातून दोन तीन वेळा धुवाव्यात. आजारी जनावरांची स्वतंत्र व्यक्तीद्वारे देखभाल करावी.

गोठ्यामध्ये इतर लोकांना प्रवेश देऊ नये. आजारी जनावरांना स्वतंत्र ठेवावे. रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी या सर्व उपाययोजना रोग प्रादुर्भाव थांबल्यानंतरही २१ दिवसांपर्यंत चालू ठेवाव्यात. लाळ खुरकत रोगाने आजारी आणि आजारातून बर्‍या झालेल्या पशूंना सामुदायिक पाणवठे, सामुदायिक गायराने या ठिकाणी किमान दीड महिना प्रवेश देवू नये.

लाळ खुरकत रोग येऊ नये म्हणून जनावरांना दर सहा महिन्यांच्या अंतराने वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे. गाभण गाई / म्हशींना लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लस दिली गेली तर त्या गाईच्या होणार्‍या वासरांचे जन्मानंतर काही काळ या रोगापासून संरक्षण होते. वासरे चार महिन्यांची झाली की त्यांना लसीची पहिली मात्रा द्यावी आणि एक महिन्यानंतर लसीची दुसरी मात्रा (बुस्टर डोस) द्यावी. लसीचा योग्य प्रभाव दिसण्यासाठी लसीकरणापूर्वी एक महिना जनावराना जंत नाशके पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्यावीत. जनावरांना पुरेसा सकस चारा आणि पशूखाद्य द्यावे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ट्रॅक्टरच्या टायरमध्ये का भरलं जात पाणी? अनेकांना पडलेला महत्वाचा प्रश्न, वाचा त्यामागचं कारण

मुंबई । नगर सहयाद्री:- आपण इतर वाहनांच्या टायरमध्ये हवा भरतो, पण ट्रॅक्टरच्या टायरमध्ये हवेऐवजी...

बाप रे! बर्फाच्या कारखान्यात धक्कादायक प्रकार; कामगाराच्या डोक्यात ‘इतके’ टाके

जामखेड । नगर सहयाद्री:- जामखेड येथे बर्फ कारखान्यात गेल्या आठ वर्षापासून कामाला असलेल्या परप्रांतीय...

मेहुणीला करायचं होतं भाऊजीला खूश, पुढे घडलं असं काही….

Crime News : सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही स्तरावर जाऊन...

अजबच! ‘सिबिल स्कोअर’ खराब असल्याने मोडलं लग्न..

Maharashtra News: सामान्य ग्राहकाला कर्ज देताना बँका त्या ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या ‘सिबिल स्कोअर’चासुद्धा...