अहमदनगर / नगर सहयाद्री : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्जुने खारे (ता. नगर) ग्रामपंचायतचे उपसरपंच अंकुश रावसाहेब शेळके यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. शेळके यांनी
राजीनाम्याचे पत्र सरपंच यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. अंकुश शेळके हे माजी खासदार दादापाटील शेळके यांचे नातू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन शेळके यांनी आरक्षणाची मागणी करत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
शेळके म्हणाले की, मराठा आरक्षणाचा संघर्ष मागील चार दशकांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. मराठा समाजाची बिकट अवस्था असून, समाज हा न्याय, हक्काचे आरक्षण मागत आहे.
आजही समाज लोकशाही मार्गाने आंदोलन करत असून, समाजाच्या संतप्त भावना व्यक्त होत आहे. सरकारने मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये. आरक्षणासाठी हा लढा सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.