अहमदनगर / नगर सह्याद्री : सोन्याचे दागिने चोरणारा सराईत गुन्हेगार एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केला आहे. अक्षय सुरेश कुलथे (वय २३, रा.राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याकडून ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व पल्सर मोटार सायकल असा दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अधिक माहिती अशी : दत्तात्रय सोजीबा मुठे (वय ५६ वर्ष, रा.निंबळक) यांनी फिर्याद दिली होती की १७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी निंबळक ते निमगाव घाणा रोड दत्तमंदिराजवळ ते स्वतः व त्यांची सून पूजा व नात असे दुचाकीवरून चालले होते. त्यांच्या मागून पल्सरवर दोघे आले. त्यांनी पूजा हिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरून नेले होते. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.
गुन्हयाचा समांतर तपास करत असताना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी अक्षय सुरेश कुलथे व गणेश शेटे (रा. राहुरी) यांनी केला आहे. ते सध्या पढेगाव ता. श्रीरामपूर येथे आहेत. त्यानुसार त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना पढेगाव येथे पाठविले. पोलिसांनी येथे सापळा रचून आरोपी अक्षय सुरेश कुलथे यास ताब्यात घेतले. या आरोपीने गुन्हयाची कबुली दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदींच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप, पोसई चांगदेव हंडाळ, पोहेकों नंदकिशोर सांगळे, राजू सुद्रिक, अनिल आव्हाड आदींच्या पथकाने केली.