पाथर्डी । नगर सहयाद्री :-
तालुक्यातील जवखेडे येथील वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणाऱ्या संस्थेतील १८ विद्यार्थ्यांना बुधवारी रात्री अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या जेवणानंतर मुलांना जुलाब, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे संस्थेच्या प्रमुखांनी तत्काळ मुलांना तिसगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
डॉ. महेश बारगजे यांनी तातडीने उपचार सुरू केल्याने गुरुवारी सकाळी १४ मुलांची प्रकृती स्थिर झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, चार मुलांवर अद्यापही उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
या संस्थेत दहा ते पंधरा वयोगटातील मुलांना वारकरी संप्रदायाचे शिक्षण दिले जाते. संबंधित घटनेने गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित मुलांच्या पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या विषबाधेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.