जामखेड | नगर सह्याद्री
जामखेड शहराचे उपनगर असलेल्या भुतवडा परिसरात बिबट्यांनी गायीवर हल्ला केला असून या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी भयभीत झाले असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या गायीचा पंचनामा करण्याचीही मागणी केली आहे.
शेतातील गुरांवर हल्ला चढवून 3 बिबट्यांनी एका गायीची शिकार केली. ही घटना जामखेड शहरातील भुतवडा वनपरिक्षेत्रांतर्गतच्या शिवारात सोमवारी (दि.9 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
भुतवडा शिवारातील कोठारी वस्ती येथे राजेंद्र कोठारी यांची शेती असून, शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या गुरांवर बिबट्याने हल्ला करून एका गायीचा फडशा पाडला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पंचनामे करावे. तसेच परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी. असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी सांगितले आहे.