पारनेर । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यात सोमवारी (दि. 5 मे) दुपारी 3.30 ते 4.30 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तिखोल, वनकुटे, टाकळी ढोकेश्वर आणि सुपा परिसरात गारपिटीने टोमॅटो, वाटाणा, कोबी, कलिंगड, चारा पिके तसेच फळबागांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाने हजेरी लावल्यामुळे तिखोल आणि वनकुटे परिसरात सुमारे अर्धा तास गारपीट झाली, तर टाकळी ढोकेश्वर आणि सुपा येथे 15 ते 20 मिनिटे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला.या गारपिटीमुळे जवळपास 1 हेक्टर क्षेत्रावरील टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले. कोबी, वाटाणा, कलिंगड यांसारखी पिके पाण्याखाली गेली, तर गारांच्या तडाख्याने फळबागांचेही नुकसान झाले. सखल भागात आणि बांधांमध्ये पाणी साचल्याने चारा पिकांनाही फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे ऐन उन्हाळ्यात काही काळ गारवा निर्माण झाला असला, तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सखल भागात पाणी साचल्याने पिकांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत मेहनतीने पिकवलेली पिके या अवकाळीने हिरावून घेतली, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांतही जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली पिके आणि कांदा साठवणूक याबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तालुक्यातील शेतकरी आता पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज घेत सावध पावले टाकत आहेत.
कांदा उत्पादकांची धांदल
अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची विशेषतः धांदल उडाली. शेतात काढून ठेवलेला किंवा चाळींमध्ये साठवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. हवामान विभागाच्या अंदाजामुळे काही शेतकरी सावध होते, परंतु अचानक आलेल्या गारपिटीने त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. “आम्ही दुष्काळाशी झुंज देत पिके जगवली, पण या अवकाळीने सर्व मेहनत वाया गेली,” अशी खंत तिखोल येथील शेतकरी सुभाष ठाणगे यांनी व्यक्त केली.
पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. टोमॅटो आणि कोबी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. लाखो रुपयांचा खर्च करून लागवड केली होती, पण आता सर्व काही पाण्याखाली गेले. असे वनकुटे येथील शेतकरी बबनराव काळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी शासनाने त्वरित पाहणी करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.