ब्रह्मा बिल्डर्सचे अग्रवाल शेठजी तुम्हीच सांगा; पुणेकरांसह नव्या पिढीने आदर्श घ्यायचा कोणाचा? तुमचा की तुमच्या दिवट्याचा? / जज्जसाहेब, अल्पवयीन असल्याने ३०० शब्दांचा निबंध; ही कसली शिक्षा! कोटीभर किमतीची पोर्शे कार चालविणारा कसला अल्पवयीन?
सारीपाट / शिवाजी शिर्के
पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात एका बिल्डरच्या अल्पवयीन दिवट्याने त्याच्या अलिशान पोर्शे कारद्वारे दुचाकीवरून जाणार्या तरुण-तरुणीला चिरडलं. नशेच्या अमलाखाली असणार्या या दिवट्याने दुचाकीवर प्रवास करणार्या तरुण- तरुणीला जागीच चिरडलं! इंजिनिअर असलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला. अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या दिवट्याने दोघांचा जीव घेतला त्याचं काय? अल्पवयीन असल्याने कोर्टाने त्याला जामिन दिलाय! मात्र, जज्ज साहेब या अशा दिवट्यांमुळे अनेकांचे जीव स्वस्तात जाऊ लागलेत! त्यांचं काय? अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा आदेश तुम्ही दिलात! जज्ज साहेब, असा निबंध लिहून देणारे हजारो मास्तर त्या दिवट्याच्या बापाकडे पाणी भरत आहेत. जज्जसाहेब, तुमचा आदेश मान्य करत हा निबंध तुमच्याकडे आलाही असेल! मात्र, पुणेकरांनो हा दिवटा जज्जसाहेबांच्या आदेशाने पुण्यातील कोणत्या चौकात उभा राहून वाहतुकीचे नियमन करत आहे आणि तो त्याच्या डोक्यावर छत्री तर कोणी धरत नाही ना याची खातरजमा नक्की करा! पुणेकरांनो, तुम्ही चौकस आहातच! तुमच्या चौकसपणातून दाखवून द्या की, ब्रह्मा बिल्डर्सच्या अग्रवालचा हा दिवटा आहे कोण आणि करतो काय? अग्रवालजी, पब आणि बारच्या संस्कृतीत तुमचा हा दिवटा पुरता वाया गेला अन् त्याने दोघांचा बळी घेतला! पुणेकरांसह नव्या पिढीने तुमचा आदर्श घ्यायचा की तुमच्या या दिवट्याचा?
सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणार्या पुण्याची ओळख बदलत चालली असल्याचे एव्हाना अधोरेखीत झाले आहेच! आता बड्या धेंडांची पोरं त्यात आणखी भर टाकत असून सामान्यांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडूच नये असा आदेश सरकारनं काढणं बाकी राहिलं आहे! लोकसभा निवडणुकीची धामधुम राज्यापुरती संपली असल्याने आता त्यातून उसंत काढत राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि पुण्यावर विशेष मेहेरबान राहत आलेल्या अजित पवार यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि मोठ्यांच्या दिवट्यांसाठी सामान्य पुणेकरांना संचारबंदी करावी अशी वेळ आली आहे.
पुण्यातल्या कल्याणी नगर जंशन या ठिकाणी रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली. ज्यामध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. ज्या पोर्शे कारने या दोघांना धडक दिली त्या कारचा चालक १७ वर्षांचा म्हणजेच अल्पवयीन आहे. या प्रकरणी अनिशचा मित्र अकीबने दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर काही तासातच त्याला सुट्टीच्या कोर्टासमोर हजर करण्यात आलं. तो अल्पवयीन असल्याचं सांगण्यात आलं आणि त्या अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जामीन देण्यात आला.
अल्पवयीन आरोपीवर लावण्यात आलेले कलम हे जामीनपात्र असून तो तपासात सहकार्य करेल असं अल्पवयीन आरोपीच्या वतीने वकिलांनी न्यायालयात सांगितलं. यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी अल्पवयीन आरोपीला अटी आणि शर्तींवर जामीन दिला. यामध्ये आरोपीने १५ दिवस येरवडा विभागात ट्राफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचं नियोजन करावं. अपघातावर त्यानं ३०० शब्दाचा निबंध लिहावा आणि दारू सोडायला मदत होईल अशा डॉटरकडून उपचार घ्यावेत असं सांगितलंय. तसंच मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घेऊन त्यासंदर्भात अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितलं असल्याचं समोर आलं आहे.
या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन असतानाही चारचाकी वाहन चालवण्यास दिल्याचा आरोप वडिलांवर करण्यात आलाय. याशिवाय मुंढवा येथील कोझी आणि ब्लॅक पबच्या व्यवस्थापनासह मॅनेजरवर अल्पवयीन मुलांना दारू पुरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, अल्पवयीन आरोपी चालवत असलेल्या पोर्शे या अलिशान कारला नंबर प्लेट नव्हती. नंबर प्लेटशिवाय शोरूम मालकाने गाडी कशी दिली असा प्रश्न समोर येत असला तरी ब्रह्मा बिल्डर्सच्या अग्रवाल यांच्यासाठी हे सहज शक्य आहे. आलिशान आणि महागडी गाडी नंबर प्लेटशिवाय देणार्या मालकावर कारवाई होणार होणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात कृती होईपर्यंत काहीही होऊ शकते!
पोलिसांनी या अपघात प्रकरणी नक्की काय म्हटलंय?
पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलगा हा पुण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. तो दारुच्या नशेत कार चालवत होता आणि त्याने दोघांना उडवलं ज्यात त्या दोघांचा मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसंच त्याला जामीनही देण्यात आला आहे. अशात एक महत्त्वाची माहिती समोर येते आहे. पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं की या प्रकरणातला आरोपी अल्पवयनी आहे. भारतीय दंडसंहितेतील तरतुदीनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल केला आहे. तसंच त्याच्याविरोधात मोटार वाहन कायद्यातील ज्या कलमांचं उल्लंघन झालं आहे ती कलमंही लावण्यात आली आहेत. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील आणि ज्या बारने या मुलाला आणि त्याच्या मित्रांना मद्य दिलं त्यांच्याविरोधात कलम ७५ आणि ७७ अंतर्गत कारवाई केली जाते आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. कारचालक असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. अनिश आणि अश्विनी हे पार्टीसाठी गेले होते. ते दुचाकीवरुन परतत असताना या मुलाने त्यांना पोर्शे कारने धडक दिली आणि त्यात या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले आहे.
जज्जसाहेब, कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन भूमिका घेतली तरच अशा अवलादींना चपराक बसेल!
सदर प्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन आहे आणि त्याने पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं न्यायालयासमोर सांगितलं आहे. आता न्यायालयाने सदर अल्पवयीन मुलाला कार अपघातावर निबंध लिहिण्यास सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे. अलिशान म्हणजे कोटीभर रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पोर्शेने दुचाकीला टक्कर दिली आणि त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. पुण्यातल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यायालायने दिलेल्या आदेशानुसार आरोपीने पंधरा दिवस येरवडा विभागात ट्राफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचं नियोजन करायचं आहे. याशिवाय अपघातावर त्यानं ३०० शब्दाचा निबंध लिहायचा आणि मद्य सोडायला मदत होईल अशा डॉटरकडून उपचार घ्यावेत असं सांगितलंय. तसंच मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घेऊन त्यासंदर्भात अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितलं आहे. ट्राफीक पोलिसांसोबत वाहतुक नियोजन करण्याचं काम जनतेसमोर येणार आहे. उर्वरीत तीन अटींची पुर्तता अग्रवाल शेठ त्यांच्या दिवट्यासाठी चुटकीसरशी करतील! शेवटी पैसा बोलतो! तीनशे शब्दांचा निबंध! अग्रवाल शेठने एव्हाना तसा आदेश काढलाही असेल आणि निबंधाच्या हजारेक प्रती त्याच्या कार्यालयात आल्याही असतील! त्यातील एक कोर्टासमोर कदाचित मांडलीही जाईल! मद्य सोडायला मदत होईल अशा डॉक्टरचे उपचार सुरू असल्याची प्रीस्क्रीप्शनही तयार झाली असेल! मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन सुरू झाल्याचा रिपोर्टही एव्हाना अग्रवाल शेठजीने तयार केला असेल! जज्ज साहेब, कायद्याच्या पळवाटा शोधणारी मोठी फौज या प्रकरणात लागयलीय! अग्रवाल शेठजींच्या या दिवट्याने दोनशेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवले आणि या दोघा तरुणांचा मृत्यू ओढवला! खरंतर या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्यानुसार हा खटला चालवला पाहिजे! मात्र, जज्ज साहेब, कायद्यासमोर आणि त्यातील तरतुदीसमोर तुम्ही देखील हतबल झाला असाल! या प्रकरणात नाहक जीव गमवावा लागलेल्या दोघा तरुणांच्या आई- वडिलांचा टाहो तुमच्या कानावर आला असेलच! अग्रवाल शेठला त्याच्या दिवट्याचं पडलंय! जीव गमावलेल्या दोघांच्या नातेवाईकांना आता त्यांची मुलं नक्कीच भेटणार नाहीत! मात्र, पुन्हा असं होऊ नये असं वाटत असेल तर अशा दिवट्यांपेक्षा त्यांच्या पालकांना कठोरातील कठोर शिक्षा होण्याची गरज आहे आणि ती खरी या दोघा तरुणांना श्रद्धांजली ठरणार आहे.