अहमदनगर | नगर सह्याद्री
बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये शनिवारी रात्री दोन गटात चांगलाच राडा झाला. कोयता, दांडयाने हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून १५ जणांविरूध्द रविवारी पहाटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जखमी आदेश किसन भिंगारदिवे (वय २० रा. भिंगारदिवे मळा, गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी रूग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून अशिष विठ्ठल शिरसाठ, चेतन संतोष सरोदे, योगेश संतोष सरोदे, शारून दाउद जाधव, यश रावसाहेब शिरसाठ (सर्व रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदेश यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री १०:२४ वाजता मित्र अमिर अकीश शेख यांनी फोन करून मित्र पंकज मच्छिंद्र दराडे यांना जय भवानी चौक येथे मारहाण झाली आहे, असे सांगितले. मी व मित्र अभिषेक लांडगे यांच्यासह दुचाकीवरून जात असताना असे समजले की पंकजला मारहाण करणारे गावडे किराणा दुकान, सरोदे यांच्या दारूच्या धंद्यावर गेले आहेत. मी व मित्र अभिषेक आणि भवानी चौकात असलेले जमिर पठाण, कार्तिक भालसिंग, परमेश्वर मगर, ओंकार आपरे, रोहित जाधव असे सर्व दुचाकीवरून गावडे यांच्या किराणा दुकानाकडे गेलो. पंकजला मारहाण केल्याचा जाब विचारला असता जवळच्या दारूच्या दुकानातून कोयता, दांडके घेऊन येत पाच जणांनी मारहाण केली. दुचाकींची तोडफोड केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जखमी चेतन संतोष सरोदे (वय १८ रा. भिम चौक, गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी रूग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून आदेश किसन भिंगारदिवे, संकेत किसन भिंगारदिवे, जमीर पठाण, सोन्या कांडगे, रोहित जाधव, पंकज दराडे (सर्व रा. गांधीनगर, बोल्हेगाव) व इतर चार ते पाच अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. चेतन यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मी कमळाच्या चिठ्ठ्या देणार्या टेबलावर बसलो असता आदेश भिंगारदिवे, संकेत भिंगारदिवे, जमीर पठाण व त्यांच्या सोबतची आणखी मुले माझ्याकडे खुन्नसने पाहत होते. शनिवारी रात्री हिरा पॅलेस येथून मित्र अशिष शिरसाठ याच्यासोबत घरी जात असताना भिम चौकात थांबलो. तेथे चार दुचाकीवरून आदेश, संकेत, जमीर, सोन्या, रोहित, पंकज व अनोळखी चार ते पाच जण आले त्यांनी माझ्यावर कोयता, दांडयाने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मित्र अशिष मध्ये पडला असता त्यांना देखील मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
एलसीबीकडून आठ जण ताब्यात
घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रात्रीतून धरपकड करून एका अल्पवयीन मुलासह आठ जणांना ताब्यात घेतले. अभिषेक ऊर्फ सोन्या राजेंद्र लांगडे, संंकेत किसन भिंगारदिवे, जमीर शौकत पठाण, ओमकार सतिष आपरे, परमेश्वर हरिभाऊ मगर, थॉमस ऊर्फ योगेश संतोष सरोदे, यश रावसाहेब शिरसाठ व एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेण्यात आले आहे.