मुंबई । नगर सहयाद्री
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेलं नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या याचिकेवर पोलिसांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉटर यांच्या खंडपीठापुढे ही याचिका बुधवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केलं. या प्रतिज्ञापत्रात सतीश यांनी केलेल्या दाव्यांचं खंडन केलं आहे. प्रतिज्ञापत्रात घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं हे नमूद केलं आहे. तसंच घटनेच्या वेळी दिशासह असलेला तिचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सत्य असल्याचं म्हटलं आहे.
त्यामुळे आदित्य ठाकरेंना लीनचिट मिळाली आहे. दरम्यान, आता खा. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की,देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे. दिशा सालियन प्रकरणात पोलिसांचा जर लिनचीटचा रिपोर्ट आला आहे. ही आत्महत्याच आहे. त्यामुळे फडणवीस, राणेंचा मुलगा यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागितली पाहिजे असे म्हटले आहे.