Maharashtra Accident News: छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गुरुवार दि. २४ रोजी दुपारी एसटी बस व कंटेनरच्या झालेल्या अपघातात १३ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघाता मधील एसटी बस सांगली आगाराची आहे. छत्रपती संभाजी नगर – सांगली बस ( क्र. एम. एच. १४ बी. टी. ४७९३) छत्रपती संभाजी नगर कडून अहिल्या नगर कडे जात होती. बसने समोर चाललेल्या कंटेनरला ( क्र. एम. एच.०४ एल.क्यु.१४६३) पाठीमागून जोराची धडक दिली. अपघात घडला त्या ठिकाणी गतिरोधक असल्याने समोरील गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली.
अपघातामध्ये एसटी बसचे चालक दादासाहेब कोळेकर यांच्यासह १३ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला तसेच लहान मुलीचाही समावेश आहे. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सनी गायकवाड, सचिन पाटोळे यांच्यासह धनगरवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली. एमआयडीसी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.
छत्रपती संभाजी नगर महामार्गावर ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडलेले असून अपघातांची मालिका सुरूच आहे. वारंवार मागणी करून देखील रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येत नाही. खड्डे बुजविण्याचे काम थातुरमातुर करण्यात आल्याचा आरोप यावेळी नागरिकांकडून करण्यात आला. तसेच छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवावेत, अपघातासाठी धोकादायक असलेल्या विविध चौकांनी रिफ्लेक्टर, सिग्नल लाईट, सूचनाफलक, झेब्रा क्रॉसिंग पट्टे व इतर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.