श्रीगोंदा । नगर सहयाद्री
श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संतश्रेष्ठ शेख महंमद महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीचा मुळासकट बिमोड करून संबंधीत लोकांवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात यावी, अन्यथा गाव बंद अंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी दिला.
आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड ग्रामस्थ यांच्या वतीने श्रीगोंदा पोलिसांना निवेदन देण्यात आले. श्री शेख महंमद महाराज यांचा पालखी सोहळा सद्ध्या सुरू आहे .या पालखीचे सर्वत्र जंगी स्वागत होत आहे. समतेचा,एकतेचा आणि शांततेचा संदेश घेऊन निघालेली ही पालखी अनेकांना मंत्रमुग्ध करत आहे. दि ०९ रोजी फेसबुक वरील वारकरी संप्रदाय या ग्रुपवर मदन जैस्वाल, प्रशांत भालोडकर, दिनेश पाटील या समाजकंठकांनी एक मुस्लिम संत बहुसंख्य हिंदूंचे ग्रामदैवत कसे असू शकते या कारणास्तव आक्षेपार्ह लिखाण करून समस्त श्रीगोंदा वासीयांच्या भावना दुखावल्या आहेत.
या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध होत आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने देखील निषेध व्यक्त करत सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने चुकीच्या पोस्ट करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीचा लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सांभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, शेख महंमद दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.