अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगरातील तृतीयपंथी समाजाचे निडर नेतृत्व आणि संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांचे 12 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. या घटनेने तृतीयपंथी समाजासह संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. काजल गुरु यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काजल गुरु हे तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी आयुष्यभर लढले. त्यांनी समाजाला दफनभूमी मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष आणि शिक्षण, रोजगार तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेले प्रयत्न अविस्मरणीय आहेत. त्यांच्या कार्याने अनेक तृतीयपंथी बांधवांना नवे जीवन आणि आत्मसन्मान मिळाला.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच आमदार संग्राम जगताप यांनी रुग्णालयात भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. काजल गुरु केवळ संघटनेचे अध्यक्ष नव्हते, तर हजारो तृतीयपंथी बांधवांचे आधारस्तंभ होते. त्यांनी दाखवलेला मार्ग आणि त्यांचा लढा समाजाला नेहमीच प्रेरणा देत राहील. “गुरु” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजल यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या कार्याला सलाम करताना समाजातील प्रत्येक स्तरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.