अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नवविवाहित जोडप्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. ११) घडली. वैभव आमले आणि स्नेहा आमले अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. मन हेलावून टाकणारी ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर येथे घडली आहे. त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत वैभव आमले आणि स्नेहा आमले हे संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रहिवासी होते. अगदी तीन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाला होता. विवाहानंतर दोघेही पुणे शहरातील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. काही दिवसांपूर्वी दोघेही अचानक गावी निघून आले. रविवारी ( दि ११) रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांनी मुळा नदीच्या मागमळीत झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
मृतदेह एका गावकऱ्याला झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. त्याने त्वरित पोलिसांना सूचित केले. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.