पारनेर / नगर सहयाद्री : नगर जिल्ह्यातील राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याची २५ जानेवारी २०२४ रोजी निर्घृण हत्या झाली. त्या घटनेने वकील वर्ग हादरुन गेलेला आहे. त्यामुळे राज्यात वकील संरक्षक कायदा तातडीने लागू करावा व वकील हत्याकांड खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करावी असे निवेदन नगर जिल्ह्यातील वकील संघाचे पदाधिकारी व आमदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंगळवारी दिले.
जिल्ह्यातील वकील संघटनेचे ९ फेब्रुवारी पर्यंत कामकाज बंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र राज्यातील वकिलांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढतच आहेत. ही गोष्ट संपूर्ण न्याय व्यवस्थेसाठीच चिंताजनक आहे. काही राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रातही वकील संरक्षण कायदा लागू होणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने येणाऱ्या अधिवेशनात हा कायदा मंजूर करावा व राहुरी येथील आढाव दाम्पत्याची हत्या झाली या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अहमदनगर जिल्हा वकील संघटनेचे वकील उपस्थित होते.
लक्षवेधी सूचना करण्याची मागणी
राहुरी तालुक्यातील अॅड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी अॅड. मनिषा आढाव या दाम्पत्याची निघृण हत्या झालेली असून घटना अतिशय निदंनीय आहे. त्याबाबत आपण पारनेर तालुक्यातील विधानसभा सदस्य या नात्याने सदर घटनेसंदर्भात आपण विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडावी.
त्याबाबत योग्य तो निर्णय आपल्या स्तरावरुन घ्यावा, वकीलांना ‘अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट’ मंजूर होणेबाबत सहकार्य करावे असे निवेदन पारनेर तालुका बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अॅड टी.बी.उबाळे, उपाध्यक्ष अॅड बी.ई.तराळ, सचिव अॅड. ए.पी.औटी आदींसह गणेश कावरे व पदाधिकाऱ्यांनी आमदार नीलेश लंके यांना दिले.