अहमदनगर । नगर सहयाद्री-
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ तारखेला मतदान होत आहे. हळूहळू या निवडणुकीत रंगत भरत असली तरी ही निवडणूक वेगळी आहे. या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार हे संगमनेर तालुयात असून त्या खालोखाल कोपरगाव आणि राहाता तालुयांत आहेत. या तालुयातील शिक्षक मतदार हे नगर जिल्ह्यात निर्णायक ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात २० मतदानकेंद्रे आहेत. यात संगमनेर आणि नगर शहरात सर्वाधिक प्रत्येकी तीन केंद्रे असून राहाता व कोपरगावमध्ये प्रत्येकी दोन मतदान केंद्र आहेत. उर्वरित तालुयांसाठी प्रत्येकी एक केंद्र आहे. जिल्ह्यातील १७ हजार ३९२ मतदारांपैकी संगमनेर, कोपरगाव, राहाता आणि नगर या चार तालुयांतच निम्मे मतदार आहेत. वरील तालुयातील नगर शहर वगळता उर्वरित ठिकाणी दोन हजारांपेक्षा अधिक शिक्षक मतदार असून अकोले, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी आणि नगर शहरात एक हजार ते एक हजार ६०० मतदार आहेत. या तालुयात जो उमेदवार वर्चस्व सिध्द करेल त्यांना नगर जिल्ह्यातून आघाडी मिळणार आहे.
नाशिक मतदारसंघात नाशिकसह नगर, धुळे, जळगाव व नंदूरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांतून ६४ हजार ८०२ मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात २३ हजार ५९७, धुळ्यात आठ हजार ८८, जळगावमध्ये १३ हजार ५६, नंदूरबार जिल्ह्यात पाच हजार ४१९ तर नगर जिल्ह्यात १७ हजार ३९२ मतदार आहेत. मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम मतदारांना नोंदवायचा आहे.
निवडणुकीसाठी आणि मतदानाच्या वेळी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षांसह दोन सहायक मतदान केंद्र अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई असे पाच कर्मचारी निवडणूक कामकाज सांभाळणार आहेत. याव्यतिरिक्त फिरत्या पथकात एक व्हिडिओग्राफर, व्हिडिओ निरीक्षक व दोन पोलिसांचा समावेश राहणार आहे.
मतदार संख्या व कंसात मतदान केंद्र
अकोले एक हजार २७ (१), संगमनेर दोन हजार ४५९ (३), राहाता दोन हजार १५१ (२), कोपरगाव दोन हजार २०७ (२), श्रीरामपूर १ हजार २८ (१), नेवासा १ हजार १५२ (१), शेवगाव ८१७ (१), पाथर्डी ९४७ (१), राहुरी १ हजार १५ (१), पारनेर ७२९ (१), नगर १ हजार ६२७ (३), श्रीगोंदा ९०९ (१), कर्जत ६४१ (१), जामखेड ३४९ (१).
जिल्ह्यातून नऊ उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातून युवा नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यासह शिक्षक प्रा. भाऊसाहेब कचरे, अमृतराव उर्फ अप्पा शिंदे यांच्यासह नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापूर्वी या मतदारसंघात १९८७ ला नगर जिल्ह्याला रा. हा. शिंदे यांच्या रुपाने आमदार मिळत मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. यामुळे यंदाच्या निवडणुकीत सर्वाचे लक्ष नगर जिल्ह्याकडे लागले आहे.