शिर्डी । नगर सहयाद्री:-
साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या चोरीसंबंधी शिर्डी पोलिस ठाण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थानच्या ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी २०२२ साली संस्थानच्या विद्युत विभागात मोठ्या प्रमाणात साहित्य गायब झाल्याची तक्रार उच्च न्यायालयात केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाची तपासणी करण्यात आली आणि प्राथमिक तपासात लाखो रुपयांच्या चोरीची पुष्टी झाली गुन्हा दाखल झालेल्या ४७ अधिकाऱ्यांमध्ये त्या काळातील विभाग प्रमुख, अभियंते, सहाय्यक कर्मचारी तसेच इतर संबंधित अधिकारी यांचा समावेश आहे.
शिर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू केला आहे. ही घटना साई संस्थान प्रशासनासाठी मोठा धक्का असून, पुढील तपासानुसार प्रकरणाचे अधिक तपशील लवकरच समोर येणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे.