ठेकेदारीच्या कारणावरून राडा; बाजारपेठेत सिनेस्टाईल दहशत, उपजिल्हा जिल्हा रुग्णालयावर हल्याचा प्रयत्
पाथर्डी / नगर सह्याद्री
ठेकेदारीच्या वादातून एक भाजपाचा कार्यकर्ता व भाजपाशी संलग्न असलेल्या ठेकेदारांमध्ये शाब्दिक चकमक होऊन तुफान हाणामारी झाली. यात तरूण ठेकेदार किरकोळ जखमी झाला. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेले असता दुसऱ्या गटातील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या टोळीने लाठ्याकाठ्यासह चाळीस ते पन्नास जनांच्या जमावाने भर बाजारपेठेतून घुसून उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट समोर जमावाने लाठ्याकाठ्यासह दहशत निर्माण केली. त्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठे भितीचे वातावरण पसरले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबत पोलीसांनी ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड प्रताप ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी याच टोळीने भर बाजारपेठेत एका पक्षाचे पदाधिकारी असलेल्या व्यापाऱ्यास त्यांच्या दुकानात घुसून मारहाण केली होती. यावेळी मोठे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले होते.
सविस्तर असे की शहरातील शेवगाव रोड जुने बसस्थानक ते जॉगिंग पार्क पर्यंत गटारीचे कामाचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते.
उद्घाटन होण्याच्या अगोदरच या ठिकाणी भाजपा कार्यकर्ता व भाजपाशी संलग्न असलेल्या तरूण ठेकेदारात शाब्दिक चकमक उडाली. त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. उपस्थित पालिकेचे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी यात भाजपाशी संलग्न असलेल्या तरूण ठेकेदार किरकोळ जखमी झाला. यानंतर तरूण ठेकेदाराने पोलीस स्टेशन गाठले व घडलेली हकीगत पोलिसांना सांगितली. यानंतर पोलिसांनी त्याला पुढील औषध उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र दुसऱ्या गटातील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या टोळीतील चाळीस ते पन्नास जनांच्या जमावाने लाठ्याकाठ्यासह भाजपाशी संलग्न असलेल्या तरूण ठेकेदाराच्या घरी जाऊन त्याला बाहेर बोलवा मी कोण आहे हे दाखवतो असे म्हणत घरी असलेल्या नातेवाईकांना शिवीगाळ करून धमकावले.
तो घरी नसल्याचे नातेवाईकांनी त्यांना सांगितले. त्यानंतर ठेकेदार उपजिल्हा रुग्णालयात असल्याचे समजताच त्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भर बाजारपेठेतून लाठ्याकाठ्या हातात घेऊन एखाद्या सिनेमात शोभेल अशीच स्टाईल आपला मोर्चा उपजिल्हा रुग्णालयाच्या दिशेने वळवली. जखमी तरुण ठेकेदार हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होता त्याच वेळी भला मोठा जमाव लाठ्याकाठ्या हातात घेऊन हॉस्पिटलच्या गेट समोर आला व मोठमोठ्याने गेट समोर आरडाओरडा करून शिवीगाळ करु लागल्याने रुग्णालयातील उपस्थित रुग्णांसह एकच गोंधळ उडाला व रुग्णाणमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
ही बाब येथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ हॉस्पिटलचे गेट बंद केले. यावेळी 40 ते 50 जनांचा जमाव हॉस्पिटलच्या गेटच्या दिशेने धावला व तिथेच लाठ्या-काठ्या भिरकवत रुग्णालयाला घेरावा घालून हॉस्पिटलवर हल्ल्याचा प्रयत्न केला याची माहिती बाजारपेठेत वाऱ्यासारखी पसरली व काही व्यापाऱ्यांनी घाबरून जाऊन आपली दुकाने देखील बंद केली. त्यामुळे बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले होते. काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी आल्या नंतर रुग्णालय परिसरात दहशत पसरविणाऱ्या टोळीने त्या ठिकाणाहून पळ काढला.
त्यानंतर त्या तरुण ठेकेदाराला पोलीस बंदोबस्तात पोलीस ठाण्यात आणण्यात आले. रीतसर पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू असताना एका पालिकेच्या
माजी पदाधिकाऱ्याने येऊन घडलेल्या प्रकाराबाबत माफीनामा देऊन मध्यस्थी केल्याने प्रकरण तात्पुरते थांबविले. मात्र या घडलेल्या प्रकरणाबाबत पाथर्डी शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. पाथर्डीचे बिहार झाले आहे अशीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. दहशत करणाऱ्यांना अभय कोणाचे? हा प्रश्न उपस्थित होत असून
पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे असे राष्ट्रवादीचे नेते ॲड प्रताप ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.