थोरात समर्थक आक्रमक : गाड्या फोडल्या, जाळपोळ, रास्तारोको
अहिल्यानगर / नगर सह्याद्री:-
विखे-थोरात कुटुंबातील तरुण पिढीत सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बाप या शब्दावरून राजकारण पेटलेले असतानाच विखे-थोरात गटातील संघर्षाचा अखेर भडका उडाला. धांदरफळ येथील सभेतून महिलांचा अवमान झाल्याचा आरोप करत थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली असून एका गाडीची जाळपोळ झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, संतप्त महिलांनी धांदरफळ येथील सभास्थळी ठिय्या देत घोषणाबाजी केली.
शुक्रवारी दिनांक 25 रोजी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बु येथे भाजपची युवा संकल्प सभा डॉ. सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थिती आयोजित करण्यात आली होती. या सभेत वसंतराव देशमुख यांची जीभ घसरली. देशमुख यांनी युवक काँग्रेस नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली.
देशमुखांनी महिला नेत्यावर टीका करताना पातळी सोडल्याचा दावा केला जात आहे. देशमुख बोलत असताना मंचावर उपस्थित काही जाणत्या कार्यकर्त्यांनी त्यांना हटकले, मात्र भान सुटल्याचे त्यांना बऱ्याच वेळांनतर लक्षात आल्याचे म्हटले जात आहे. याचे पडसाद तालुक्यात उमटले.
सोशल मीडियातून ही वार्ता वेगाने पसरली. त्यानंतर शेकडो महिला, कार्यकर्ते धांदरफळ येथील सभास्थळी धावून गेले. धांदरफळ येथे विखेंच्या सभेनंतर स्थानिक थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांनी, सभास्थळी ठिय्या देत देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
सभा आटोपून परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांना संतापाचा फटका
अकोले नाका परिसरातील पुलाखाली, खांडगाव दुध डेअरी समोर चिखली येथे १०:३० च्या सुमारास संतप्त कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचा फोडल्याची घटना घडली. त्यानंतर एका गाडीची जाळपोळही झाली. संगमनेर पालिकेच्या अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची माहिती मिळताच पोलीस दल तातडीने सावध झाले. नियंत्रणासाठी फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी अनेकांची धरपकड सुरू केली आहे.