निघोज / नगर सहयाद्री
गाव पातळीवर बालविवाह, हुंडा प्रथा व कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या अनिष्ट प्रथा समूळ नष्ट करण्याचा निर्धार ‘आदिशक्ती अभियान’ने केला आहे. ही जबाबदारी प्रत्येक महिलेनं स्वतःच्या कुटुंबातून सुरू करावी, असे आवाहन आदिशक्ती अभियानच्या अध्यक्षा सोनाली सालके पाटील यांनी केले. निघोज येथील मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विठ्ठल मंदिर आयोजित विशेष ग्रामसभेत त्या बोलत होत्या. ग्रामपंचायतीच्या महिला पदाधिकारी, रणरागिनी ग्राम संघाच्या सदस्या, स्थानिक महिला व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याविशेष ग्रामसभेत प्रत्येक महिलेनं आपल्या कुटुंबात, परिसरात बालविवाह होऊ न देणे, मुलींच्या शिक्षणासाठी सहकार्य करणे, त्यांना आनंदी व भयमुक्त वातावरण मिळवून देणे आणि शिक्षणात समान संधी मिळवून देणे, यासाठी ठाम शपथ घेतली.
महिलांना मार्गदर्शन करताना सालके म्हणाल्या, विश्वगुरू पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी तळागाळातल्या महिलांपर्यंत लखपती दीदी, बचत गटांसाठी खेळता निधी, कर्ज योजना, लाडकी बहीण, मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत प्रवेश, अशा विविध योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून दिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्र शासन अतिशय प्रभावीपणे समृद्ध पंचायतराज अभियान राबवत आहे. महिलांचा सहभाग असणे व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. महिलांनी पुढे आल्यास प्रत्येक पंचायत समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास सरपंच अनिता आढाव, उपसरपंच अनिता रासकर, पोलीस पाटील बबनराव सालके, ग्रामपंचायत सदस्य बेबी गवळी, मनीषा पठारे, कांताबाई जाधव, रणरागिनी ग्राम संघाच्या अध्यक्षा अनिता अवचिते, आरती पठारे, प्रियंका रासकर, अनुराधा गवळी, आरती तांबे, मोनिका करपे, मीना शिंगाडे, रत्नमाला शिंगाडे, रूपाली गवळी, स्वाती जाधव, संगीता विश्वासराव, स्वाती रासकर, रूपाली चौधरी, कल्पना पठारे, रेश्मा शेख, सना शेख, भारती खुपटे, कविता खुपते तसेचअनेक महिला कार्यकर्त्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामसेवक खामकर व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.