spot_img
अहमदनगरभिल्ल समाज जमीन स्कॅमची पवार पाठराखण करणार का?

भिल्ल समाज जमीन स्कॅमची पवार पाठराखण करणार का?

spot_img

बाळासाहेब थोरात घेरले जाण्याचीच अधिक शक्यता | एसपी ऑफीस हल्ला प्रकरणातील आरोपी कळमकर काका-पुतणे अ‍ॅशन मोडमध्ये

सारिपाट / शिवाजी शिर्के

समाजातील दिनदुबळ्यांसह आदिवासी- मागासवर्ग आणि वंचित घटकांसाठी काम करत आलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ज्या समाजाने कायम पाठबळ दिले, त्याच समाजाची जमिन लाटण्याचा धक्कादायक प्रकार नगरमध्ये घडला आहे. पवार यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष असणार्‍या राजेंद्र फाळके यांचे बंधू आणि पुतणे यात मुख्य आरोपी असून सध्या ते परागंदा झाले आहेत. पोलिस त्यांच्या शोधात आहेत तर, त्यांचे बंधू राजेंद्र फाळके हे आपला त्याच्याशी काहीच संबंध नसल्याचे दाखवत आहेत. मात्र, एकत्र कुटुंबातील राजेंद्र फाळके हेच त्यांच्या कुटुंबात निर्णय घेत आले असल्याचे कर्जतकरांसह नगरकर जाणत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला असल्याने हे प्रकरण आमच्यावर शेकवल्याचा आरोप करण्याची संधी देखील आता फाळके यांना मिळणार नाही. एकूणच निंबळकचे हे जमिन प्रकरण आता निवडणुकीच्या विषयातील मुख्य मुद्दा झाल्यास आश्चर्य वाटू नये! शरद पवार यांचे डावे- उजवे समजल्या जाणार्‍या राजेंद्र फाळके यांच्या कुटुंबातील सदस्यांवर जमिन हडपणे आणि ऍट्रासीटीचे गुन्हे कोर्टाच्या आदेशानुसार दाखल झाले असताना त्याच फाळके यांच्याबाबत शरद पवार हे काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे. पवार हे नगरच्या दौर्‍यावर येत असताना फाळके हेच यांचा वावर अधिक दिसल्यास त्याचे परिणाम नीलेश लंके यांना भोगावे लागू शकतात. पवारांच्याच आशीर्वादाने फाळके यांचे हे धाडस झाले आणि पवारांच्या आशीर्वादाने फाळके कुटुंब पोलिस कारवाईतून सुटत असल्याचा चुकीचा मेसेज पवार देतात की फाळके यांना दूर ठेवतात हे येत्या काही दिवसात दिसून येणार आहे.

लोकसभेची निवडणूक तापू लागली आहे. त्यातच आदिवासी भिल्ल समाजाच्या मालकीचे जमिन खरेदी विक्री व्यवहार होत नसल्याचे माहिती असूनही त्या जमिनीची परस्पर खरेदी- विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणात अन्याय झालेल्या कुटुंबाने पोलिसात तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. यानंतर संबंधितांनी न्यायालयात दाद मागितली आणि त्यानंतर न्यायालयीन आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे.

राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे सख्खे बंधू शिवाजीराव आनंदराव फाळके, राजेंद्र फाळके यांचे पुतणे जयवंत शिवाजीराव फाळके, नातेवाईक माणिक पलांडे यांच्यासह काही नामांकित लोक यात प्रमुख आरोपी असून त्यांच्यावर फसवणूक व ऍट्रासीटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झालेले बहुतांश आरोपी आता नॉटरिचेबल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या फाळकेंच्या कुटुंबातील तीन आरोपींचा यात समावेश आहे. हे धक्कादायक आहे. या तिन्ही नातेवाईकांच्या माध्यमातून असणारी गुंतवणूक राजेंद्र फाळके यांचीच असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. हा गुन्हा निवडणूक काळात पुढे आलेला नाही तर काही वर्षांपूर्वी ही फसवणूक झाली होती.

सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची धमकी देणार्‍या निवृत्ती गाडगे याच्यावर कारवाई करतानाच विखे यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन करण्यात आली. यानंतर जे गुन्हेगार आहेत तेच निवेदन देण्यासाठी पुढे गेले होते अशी टीका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी माध्यमांद्वारे केली होती. मात्र, पोलीस अधीक्षक कार्यालय हल्ला प्रकरणात शरद पवारांचे निकटवर्तीय असणारे दादा कळमकर, नगर शहराचे विधानसभेचे स्वप्न पाहणारे अभिषेक कळमकर हे देखील आरोपी होते याचा महाविकास आघाडीतील किरण काळे यांना विसर पडला असल्याचे दिसते.

एसपी कार्यालय तोडफोड प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रत्येक तारखेला कळमकर काका, पुतण्यांची तारखांना हजेरी असल्याचे विसरुन कसे चालणार! विखेंच्या सोबत गेले म्हणजे गुंड किंवा लंके यांच्या सोबत गेले म्हणजे गुंड असा डांगोरा पिटवून दोघांच्याही समर्थकांना चालणार नाही. सुप्याच्या सभेत विखेंसोबत गुंड होता अशी पोस्ट टाकणार्‍या लंके समर्थकांना तोच गुंड लंके यांच्यासाठी काही महिन्यांआधीच डान्स करत होता याचा विसर कसा काय पडला हाही प्रश्न आहेच!

गरिबी विरुद्ध श्रीमंतीच्या लढाईचा फक्त डांगोरा!
दक्षिणेच्या राजकारणात कधी नव्हे ते उत्तरेचे नेते असणारे विखे यांचे पारंपारिक विरोधक बाळासाहेब थोरात यांनी लंके यांची निवडणूक हाती घेतली आहे. थोरात यांच्या शिक्षण, सहकार संस्थांतील शेकडो कर्मचारी सध्या दक्षिण स्वारीवर आहेत. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लंके यांनी थोरात यांच्या संगमनेरच्या सुदर्शन बंगल्यावर जाऊन आशीर्वाद निलेश लंके यांनी घेतला. त्याचवेळी माध्यमांना मुलाखती देत ही लढाई गरिबी विरुद्ध श्रीमंतीची असल्याचे पहिल्याच दिवशी जाहीर केले. मात्र त्याच संगमनेर मध्ये जात राधाकृष्ण विखे यांनी आता विधानसभेला संगमनेर सुद्धा गरिबी विरुद्ध श्रीमंतीची निवडणूक करून पाहू असे म्हणत विधानसभेला थोरात यांना त्यांनीच पुढे केलेल्या मुद्द्यावरून घेरण्याचा मनसुबा जाहीर करून टाकला आहे. वास्तविक नगरच्या लढाईत गरीब कोण हे आधी ठरवून घ्यावे लागणार आहे आणि त्याची व्याख्या जाहीर करावी लागणार आहे.

… तर डॉ. जयश्री थोरात यांची वाट होणार अधिक बिकट!
नगर दक्षिणेत थोरात यांची यंत्रणा सध्या तळ ठोकून आहे. नगरचा निकाल काहीही लागला तरी येत्या काही महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. थोरात हे आपली राजकीय वारसदार असणार्‍या डॉटर कन्या जयश्री थोरात यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्या नवख्या आहेत. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल हाती असणारे देवेंद्र फडणवीस यांचा भरभक्कम आशीर्वाद असणारे थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे हे देखील आपल्याच मामाच्या विरोधात बंड करण्याची संधी सातत्याने शोधत आहेत. नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत भाजपने उमेदवार दिला नाही. फडणवीस, विखे यांनी तांबे यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेत विजय देखील मिळवून दिला. यामध्ये ज्या सुजय विखे यांच्या साठी मैदानात उतरलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले आणि त्यांचे जावई आ.संग्राम जगताप यांना देखील लक्ष केले जात आहे त्याच कर्डीले, जगताप यांची देखील मदत तांबे यांना विजयासाठी मिळालेली आहे.

गरीब विरुद्ध श्रीमंतीच्या लढाईचा संगमनेरात सर्वाधिक धोका!
शरद पवार हे देशाच्या राजकारणातील चाणय म्हणून ओळखले जातात. खरंतर बाळासाहेब थोरात यांना मुलीला संगमनेरमधून आमदार करत स्वतः नगर दक्षिणेतील खासदार व्हायचे होते. तसे त्यांनी पवारांची भेट घेत सांगितलेही होते. पण थोरात सिल्वर ओक वरून बाहेर पडून संगमनेरला पोहोचत नाहीत तोच वस्ताद असणार्‍या शरद पवारांनी थोरात यांच्यावरच डाव टाकला. लंके यांना तातडीने आमदारकीचा राजीनामा देण्याचे फर्मान धाडले आणि जागा काँग्रेसला सुटणारच नाही याची खबरदारी घेतली. पवारांनी थोरात यांच्या पदरी निराशा टाकली. सातार्‍यात उदयनराजे भोसले यांच्या विरोधात काँग्रेसचे बडे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी करण्याचा प्रस्ताव पवारांनी दिला. पण निष्ठावान चव्हाणांनी तुतारी ऐवजी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याची तयारी दाखवली. पवारांनी तिथेही खेळी केली. शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवले. या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर सुजय विखे यांचे राजकीय अस्तित्व संपण्याचा विडा उचललेले थोरात हे मात्र विसरले की विखेंना अस्तित्वहीन केल्यास उद्या हेच विखे संगमनेर मध्ये दाखल होत स्वतः थोरात अथवा त्यांची कन्या विधानसभेची उमेदवार असताना तिथेही गरिबी विरुद्ध श्रीमंतीची लढाई उभी करत थोरात यांना अस्तित्वहीन करण्यासाठी जीवाचा आकंत तांडव केल्यास आश्चर्य वाटू नये! याचाच अर्थ विधानसभेच्या येत्या निवडणुकीत उद्या विखे यांनी संगमनेर मध्ये जाऊन गरीबीचा धमाका केल्यास संपूर्ण देशाच्या राजकीय पटलावर नवा इतिहास लिहिला जाईल.

नगरमध्ये ‘एनर्जी’ खर्च करणार्‍या थोरातांना सहा महिन्यानंतर विखे घाम फोडणार!
भविष्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाच्याचा अडथळा नको म्हणून काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचा आदेश डावलून थोरात यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा ताकतीने लढवली नसल्याचा आरोप आजही कायम आहे. त्यांनी तात्पुरता जरी भाच्याचा अडथळा दूर केला असता तरी विखे यांचे राजकीय अस्तित्व संपवायला निघालेल्या थोरतांचेच विधानसभा निवडणुकीत राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी विखे आता कंबर कसणारा हे लपून राहिलेले नाही. गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने दुखावलेले विखे हे त्यांच्या गणेशमधील पराभवाचे उट्टे काढणार हे नक्की! त्यामुळे दक्षिणेतली लोकसभा रंगतदार तर उत्तरेतील विधानसभा गाजणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

जिल्ह्यातील काँग्रेसचा पंजा नामशेष होण्याच्या मार्गावर!
काँग्रेससाठी सुरक्षित असणारा संगमनेर मतदारसंघ देखील आता थोरात यांच्या दक्षिणेत विखे यांना शह देण्याच्या धाडसी खेळीमुळे असुरक्षित होण्याच्या वाटेवर आहे. श्रीरामपूरला आमदार असणार्‍या काँग्रेसचे लहू कानडे यांचे आपल्याच पक्षातील करण ससाने गटासमवेत टोकाचे राजकीय वितूष्ट निर्माण झाले आहे. ससाने हे पूर्वीपासून विखे यांचे विश्वासू आहेत. काँग्रेसचा उमेदवार कोणीही असला तरी ससाणे गटाच्या मदती शिवाय काँग्रेस उमेदवाराचा विजय दुरापास्त आहे. त्यातच विखे यांनी श्रीरामपूरला भाजपचा आमदार करण्यासाठी मागील वर्ष भरापासून ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे श्रीरामपूरला देखील पुन्हा काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्याची शयता धुसर झाली आहे. जिल्ह्यातील उत्तर, दक्षिण या दोन्ही लोकसभेच्या जागांपैकी एकही जागा गांधी घराण्याशी जवळीक सांगणार्‍या बाळासाहेब थोरात यांना मिळवता आलेली नाही. थोरात कट्टर समर्थक काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते त्यामुळे उत्तरेतून बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्यांनी जरी बंडखोरी केली नाही तरी थोरात यांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांना खासदार, आमदार होणे यासाठीची ताकद देण्यास थोरात अससमर्थ आहेत याची कार्यकर्त्यांमध्येच आता दबया आवाजात नाही तर जाहीररित्या चर्चा सुरू झाली आहे. दक्षिणेत विधानसभेचे सहा मतदार संघ आहेत. त्यातील एकही मतदारसंघ काँग्रेस लढत नाही. जिल्हा परिषदेचा एकही सदस्य काँग्रेसकडे नाही. पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात नाहीत. अहमदनगर महानगरपालिकेत काँग्रेसचे चिन्हावरील पाच नगरसेवक होते. त्यापैकी चार नगरसेवक तर उघडपणे थोरतांचे नेतृत्व झुगारून सुजय विखे यांच्या प्रचार प्रक्रियेत सक्रिय आहेत.

ज्ञानदेव वाफारेची जन्मठेप भोवणार; घनश्याम शेलार काही महिन्यांचेच पाहुणे!
जिल्ह्यातील संघटनात्मक भिस्त असणारा थोरात यांचा विश्वासू कार्यकर्ता आणि जिल्हा काँग्रेसचा चाणय म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्ञानदेव वाफारे याला संपदा गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वाफारे याने पारनेरसह नगर शहरातील गोरगरीब महिलांसह कष्टकर्‍यांना टोपी घातली. कोट्यवधी रुपयांच्या ठेवी त्याने गडप केल्या. याच वाफारे याला पाठीशी घालण्याचे काम झाले आणि तोच वाफारे आज जन्मठेपेत आत बसलाय! वाफारे हे पाप पोसण्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागल्यास आश्चर्य वाटू नये! श्रीगोंद्यातून घन:श्याम शेलार यांचा पक्षप्रवेश नुकताच झाला आहे. मात्र आधी पत्रकार, छायाचित्रकार मग भाजप त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना, पुन्हा राष्ट्रवादी, त्यानंतर बीआरएस असा अनेक राजकीय पक्षांचा प्रवास शेलार यांनी केलेला आहे. नागवडे यांनी थोरात यांची साथ सोडल्यामुळे शेलारांना काँग्रेसमध्ये प्रवेश देत काँग्रेसचे अस्तित्व दाखवण्याची नामुष्की थोरातांवर आली. मुळात राहुल जगताप यांच्यासारख्या साखर कारखानदार असणारा आणि मतदारसंघाचा आमदार राहिलेला उमेदवार शरद पवारांकडे असताना उद्या शेलारांना उमेदवारी मिळाली नाही तर थोरात यंना सोडून ते पुन्हा नवीन पक्षात गेले तर नवल वाटू नये.

रोहित पवारांना हूक लावण्यासाठी राजेंद्र फाळकेंना विधानपरिषद!
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यावर भाजप बरोबर आधी जाण्याचे ठरवल्यानंतर माघार घेत आपल्याला तोंडघशी पाडले असा गंभीर आणि खळबळ जनक आरोप करत बंडखोरी केली. थोरल्या पवारांची साथ सोडत धाकल्या पवारांना बळ देत पवारांचे अनेक ज्येष्ठ सहकारी देखील भाजप समवेत गेले. जवळपास सर्वच आमदारांनी अजित पवारांचे नेतृत्व पसंत केले. नीलेश लंके देखील त्यातील एक आमदार. किंबहुना लंके यांचा आमदारकीचा महामेरू अजित पवारांमुळेच विजयी झाला हे सर्वश्रूत! असे असताना अजित पवारांच्या गोटातून लंके यांना खेचून आणण्याची किमया करत धाकल्या पवारांना धोबीपछाड देण्याची किमया करून दाखविलेल्या राजेंद्र फाळके यांना लंके यांचा लोकसभेत विजय मिळाल्यास विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची आस आहे. शरद पवार यांनी कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजित पवार यांना डावलले. त्याचा बंडखोरी होत स्फोट झाला. भविष्यात पवारांचे नातू असणारे कर्जत – जामखेडचे आमदार असणारे रोहित पवार यांनी देखील राजकीय महत्त्वकांक्षेतून त्यांची आत्या असणार्‍या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बंड केले तर आश्चर्य वाटू नये! त्यामुळे रोहित पवार यांच्या विरोधात त्यांना त्यांच्याच मतदारसंघात हूक लावण्याचे काम फाळके यांना विधान परिषदेच्या आमदारकीची पावती देऊन पवार मोठी खेळी खेळू शकतात. असे झाल्यास विधान परिषदेचे आमदार म्हणून फाळके हे भविष्यात रोहित पवार यांच्या विरोधात कर्जत – जामखेड मध्ये स्वतःचे संघटन मजबूत करून विधानसभेत दिसल्यास आश्चर्य वाटू नये.

संगमनेरचा पाया अधिक भक्कम न झाल्यास राजकीय अस्तित्वाला निर्माण होऊ शकतो धोका!
नगर शहरात किरण काळे यांच्या रूपाने थोरात यांनी पक्षात चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून काँग्रेसचा नवसंजीवनी मिळाली असलेही. तरी देखील जे उत्कर्षा रूपवते यांचे झाले तेच उद्या उमेदवारीच्या बाबतीत किरण काळे यांचे झाले तर आश्चर्य वाटू नये. कारण एसपी ऑफिस हल्ला प्रकरणातील आरोपी असणारे कळमकर काका, पुतणे यांनी लंके यांच्या लोकसभेच्या मांडवात स्वतःच्या विधानसभेचे लग्न उरकून घेण्याचा राजकीय डाव टाकलेला आहे. नागवडेंनी साथ सोडल्यानंतर जयंत वाघ यांना जिल्हाध्यक्ष केले गेले. सुरुवातीला अनेकांना हे वाघ कोण हा प्रश्न पडला होता. वाघ यांचा राजकीय आवाका आणि ताकद किती हे सर्वश्रुत आहे. त्यातच संघटनेचा बॅकबोन असणारे वाफारे जन्मठेपेच्या शिक्षेमुळे तुरुंगवासी झाल्यामुळे आता वाघ यांच्या मदतीला नसल्याने वाघ हे कावरेबावरे झालेत ही वस्तुस्थिती आहे. कार्यकर्त्यांनी थोरात यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून कितीही उदो उदो केला तरी भविष्यात संगमनेरच विजयापासून चार हात लांब राहिले आणि उत्तर, दक्षिणेसह जिल्ह्यातील काँग्रेस नामशेष झाली तर मुख्यमंत्री होण्याचे थोरात यांचे स्वप्न विखे कदापि पूर्ण होऊ देणार नाहीत, हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची नक्कीच गरज नाही. म्हणूनच बाळासाहेब थोरात यांना या निवडणुकीच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. उद्या आपल्या स्वत:च्या अस्तित्वासाठीच लढत करावी लागू नये याची काळजी देखील घ्यावी लागणार आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; गृह, महसूल मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान…

मंत्रिमंडळ विस्तार हालचालींना वेग / राष्ट्रवादी काँग्रेसचे ०७ कॅबिनेट, ०३ राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित? मुंबई |...