मुंबई / नगर सहयाद्री : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या व राजकीय वनवास भोगत असणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून लोकसभेचे तिकीट जाहीर झाले आहे. त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे या तेथे भाजपच्या स्टँडिंग खासदार होत्या.
त्यांचे तिकीट कापत पंकजा मुंडे यांना तिकीट दिले आहे. त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंकजा यांनी आपल्या बहीणीचं तिकीट कापून आपल्याला उमेदवारी मिळाली असली तरी प्रीतम ताईला आपण विस्थापित करणार नाही, असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं आगामी काळात राज्यसभा निवडणूक, विधानसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीत राजकीय पुनर्वसन होतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
“माझी उमेदवारी जाहीर झाली ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक आहे. त्यामुळे माझ्या भावना आभाराच्या आहेत. थोडीसी संमिश्र भावना नक्कीच आहेत. कारण प्रीतम मुंडे या गेल्या 10 वर्षांपासून खासदार होत्या. त्या खासदार असताना मी राज्याचं राजकारण करत असताना आता एकदम केंद्राच्या राजकारणात जात असताना थोडीसी धाकधूक नक्कीच वाटतेय. पण नवीन अनुभव आहे”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, आमच्या दोघींमध्ये चांगला समन्वय होता आणि ते भविष्यातही राहणार आहे. प्रीतम ताई खासदार असताना मी पाच वर्ष घरी बसले. आम्हाला तोही अनुभव आहे. आता मला असं वाटतं तेवढा वेळ प्रीतम ताईंना वाट बघावी लागणार नाही. मी जे शब्द जाहीररित्या सांगितले की, मी प्रीतम मुंडे यांना विस्थापित करणार नाही. त्या शब्दावर मी कायम आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.