‘नगर सह्याद्री’चा अंदाज खरा ठरला | शरद पवार यांच्या उपस्थितीत केला पुण्यात प्रवेश | सुजय विखे विरुद्ध निलेश लंके लढत होणार
पुणे | नगर सह्याद्री :
लोकसभेच्या नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून विद्यमान खा. डॉ. सुजय विखे पाटील हेच उमेदवार असणार हे दोन महिन्यांपूर्वी ‘नगर सह्याद्री’ने व्यक्त केलेले भाकीत खरे ठरले. त्याचबरोबर नगरमध्ये काहीही झाले तरी सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांच्यातच लोकसभेची निवडणूक होणार आणि आ. लंके हे अजित पवार गटाची साथ सोडणार याबाबत दोन महिन्यांपूर्वीच ‘नगर सह्याद्री’ने व्यक्त केलेला अंदाज आज तंतोतंत खरा ठरला.
अजित पवार यांनी विरोध केला असतानाही आ. निलेश लंके यांनी त्यांच्या मिनतवारीला कोलून लावले आणि थेट पुण्यात येऊन खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह ‘पुस्तक प्रकाशन’ या गोंडस नावाखाली तुतारी फुंकली! राज्याच्या राजकारणात दबदबा असणार्या अजित पवार यांना निलेश लंके यांनी धोबीपछाड दिल्याचेच मानले जात असून अजित पवार यांना हा सर्वात मोठा पहिला राजकीय धक्का देण्यात आ. लंके हे यशस्वी झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत जागा वाटप चालू असताना नगरच्या जागेवर भाजपाकडून खा. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी सायंकाळी जाहीर झाली. त्याआधी पारनेरचे आमदार लंके यांनी दिवसभर मंत्रालयात अजित पवार व अन्य सहकार्यांच्या गाठीभेठी घेतल्या. पारनेरमधील राजकीय समिकरण आणि विखे यांच्याकडून झालेला त्रास याचा पाढा लंके यांनी अजित पवार यांच्यासमोर वाचला. कोणत्याही परिस्थितीत आपण माघार घेऊ शकत नसल्याचे त्यांनी अजित पवार यांना ठणकावून सांगितले. अजित पवार यांनी मनधरणी केली किंवा कसे याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, शरद पवार यांच्यासोबत आपण जात असल्याचे ठणकावून सांगत लंके यांनी मुंबई सोडली आणि रात्री उशिरा पुण्याकडे रवाना झाले.
दरम्यान, रात्री उशिरा आ. लंके यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पुण्यात येण्याचे फर्मान सोडले. पुस्तक प्रकाशन समारंभ असल्याचा निरोप देण्यात आला. कोरोणा काळात लंके यांनी केलेल्या कामावर आधारीत एक पुस्तक तयार करण्यात आले असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शिवाजीनगर, पुणे येथे होणार असल्याचा मेसेज सोशल मिडियावर पहाटेपासून व्हायरल होऊ लागला. त्यानुसार समर्थक कार्यकर्ते पुण्याकडे रवाना होऊ लागले. शिवाजीनगर परिसरात असणार्या राष्ट्रवादी भवनमध्ये हा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम असल्याचे दुपारी स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ पुस्तक प्रकाशन हे निमित्त असून त्याच कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश आणि उमेदवारीची घोषणा करण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांना स्पष्ट करण्यात आले.
मविआकडून राणी लंके नव्हे
निलेश लंके हेच उमेदवार!
नगर मतदारसंघातून राणी लंके की निलेश लंके उमेदवार असणार याबाबत चर्चा झडत होत्या. मात्र, शरद पवार हे निलेश लंके यांच्या नावासाठी आग्रही राहिले. त्यातूनच राणी लंके यांचे नाव मागे पडले आणि आ. निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. कार्यकर्त्यांनी देखील त्यांनाच उमेदवारी करण्याचा आग्रह केला. त्यानुसार आता या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निलेश लंके हे असणार हे नक्की झाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार,
दिलीप वळसे पाटील यांना पाडले तोंडघशी!
अजित पवार यांची साथ सोडणार नाही असे अलिकडे काही महिन्यांपासून सांगणार्या आ. निलेश लंके यांनी त्याआधी राष्ट्रवादीत फुट पडण्याआधी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची साथ सोडणार नाही असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी शरद पवारांची साथ सोडली. अजित पवार भाजपा सोबत गेल्यानंतर निलेश लंके यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. लंके यांना ताकद देण्यासाठी अजित पवार यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना समर्थन दिले. मात्र, लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात बेरजेचे राजकारण करणार्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना निलेश लंके यांनी धोबीपछाड दिली. या दोघांसह वळसे पाटील यांनाही निलेश लंके यांनी तोंडघशी पाडणार्या आ. लंके यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. अजित पवार यांची साथ सोडत शरद पवार यांच्या गोटात दाखल होणारे आणि अजित पवारांना शह देणारे लंके हे पहिले आमदार ठरले आहेत.
आ. राम शिंदेंनी दिल्या आ. लंके यांना शुभेच्छा!
भाजपाकडून सुजय विखे यांचे नाव दुसर्या यादीत उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर मंगळवारी सकाळीच भाजपाचे विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेऊन पुण्यात दाखल झालेल्या निलेश लंके यांना शुभेच्छा दिल्या. राम शिंदे यांनी त्यांच्या खास दुतामार्फत पुण्यात शरद पवार यांच्या गोटात दाखल झालेल्या निलेश लंके यांच्याशी संपर्क साधला. ‘लढा, आम्ही आहोत सोबत’, अशा मोजक्या शब्दांमध्ये शिंदे यांनी लंके यांना शुभेच्छा दिल्या! राम शिंदे यांच्या या शुभेच्छा म्हणजे भाजपा पक्षश्रेष्ठी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनाचा शह असल्याचे मानले जाते. राम शिंदे यांची ही भूमिका त्यांची व्यक्तीगत आहे की त्यांना पाठींबा देणार्या राज्यातील नेत्यांची आहे हे लवकरच समोर येईल. मात्र, राम शिंदे यांच्या या जाहीर शुभेच्छा आता चर्चेचा विषय ठरल्या आहेत.