Rain update: या वर्षी राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि धरणे तुडूंब भरली आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आज राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट तर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट आहे.
या वर्षी भारतात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सप्टेंबरच्या मध्यावर कमी दाबाची प्रणाली विकसित होऊन पाऊस पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
सामान्यतः मान्सून जून महिन्यात सुरू होतो आणि सप्टेंबरमध्ये परतीचा प्रवास सुरू होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून पाऊस थांबतो. पण यावेळी मान्सून लवकर परतण्याची शक्यता आहे.