अहमदनगर । नगर सहयाद्री-
पती-पत्नीच्या पवित्र नात्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद होत असतात. काही वाद क्षणांत मिटतात तर काही टोकाला जातात. पण पवित्र नात्यात तिसरी व्यक्ती आल्याने सर्वच बिघडतं. फसवणुकीमुळे नातंच संपतं. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
बंद खोलीत पतीला दुसऱ्या एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडल्याने रागातून पतीने इतरांच्या मदतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना नगर शहरातील उपनगरात घडली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या पत्नीवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी या त्यांच्या पती व तीन मुलांसह नगर शहरातील उपनगरात राहतात. त्यांनी सोमवारी (दि. ८) सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या पतीला दुसऱ्या एका महिलेसोबत बंद खोलीमध्ये नको त्या अवस्थेत पकडले. त्याचा राग मनात धरून त्या महिलेने तिच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईकही घटनास्थळी आले व त्यांनी फिर्यादीला लोखंडी गज, लाकडी दांडक्याने मारहाण मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.