अहमदनगर । नगर सहयाद्री-
नगर शहरात ताबेमारीच्या घटना थांबायला तयार नाहीत. सावेडी उपनगरातील एका मोयाच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या ताबा मारण्याच्या गैरहेतूने काही गैर कायद्याची मंडळी संगनमताने त्रास देत असल्याची फिर्याद असणारा अर्ज एका पीडित ज्येष्ठ नागरिक असणार्या विधवा महिलेने तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे सादर करत आपली कैफियत मांडली होती. मात्र त्याला केराची टोपली दाखवली गेली होती. सदर पीडित महिलेने काँग्रेस पक्षाशी संपर्क साधल्यानंतर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली.
यावेळी काळे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईत संघटित गुन्हेगारांच्या टोळ्यांकडून सुरू असणार्या ताबेमारीच्या बेकायदेशीर घटनांना मोक्का कायद्यांतर्गत आळा घालण्याची, पीडित महिलेला न्यायापासून वंचित ठेवणार्या तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचे तात्काळ निलंबन करीत तटस्थ, प्रामाणिक वरिष्ठ अधिकार्यामार्फत सत्यशोधक चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्याची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व एसपी ओला यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे कागदोपत्री पुरावे सादर करत शहर काँग्रेसच्या वतीने मागणी केली आहे.
याबाबत महिलेने दि. २२ व २४ मे रोजी एसपींकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तसेच २५ मे ला सदर महिलेचा अर्ज स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे दि. २७ मे रोजी एसपींकडे पुराव्यांसह फिर्याद दिली. तरी देखील गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे शहर काँग्रेसने एसपींचे लक्ष वेधले आहे.
पीडित महिलेवरच गुन्हा दाखल
दरम्यान दि. २२, २४, २५ व २७ मे रोजी तोफखाना पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उंबरे झिजवणार्या पीडिता व कुटुंबातील सदस्यांच्या विरोधातच तोफखाना पोलीस निरीक्षक कोकरे यांनी २७ मे रोजी रात्री उशिरा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कोणी गुन्हा केला असेल तर त्याला कठोर शिक्षा व्हावी. मात्र पीडित महिला तोफखाना पोलीस निरीक्षकांना वारंवार दाद मागत होती. तिची फिर्याद दाखल करून घेतली गेली नाही. पीडितेवर अन्याय केला गेला असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.