पारनेर | नगर सह्याद्री-
जिल्ह्यात विविध तालुक्यातील शिक्षक समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना पारनेर आणि पाथर्डी येथील प्रक्रिया रखडली आहे. त्यात पारनेरमध्ये हंगा येथील दोन शिक्षकांना कुठे समायोजित करायचे, या प्रश्नावरून समायोजन थांबल्याचे समजते.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या नियमानुसार पटसंख्येनुसार शिक्षक समायोजन दरवर्षी करणे गरजेचे आहे. पूर्वी हे समायोजन तीन वर्षातून एकदा केले जायचे; परंतु आता त्यावर्षीच्या पटसंख्यानुसार पुढील अतिरिक्त शिक्षकांना तेथून हलवणे आणि जर पटसंख्या वाढली तर तेथे नवीन जागा तयार होऊन इतर ठिकाणी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना समायोजित केले जाते.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर आणि पाथर्डी वगळता जवळपास सर्व तालुयांत समायोजन प्रक्रिया पंचायत समितीने पूर्ण केल्याचे समजते. पारनेर आणि पाथर्डी तालुयातील ‘समायोजन’ थांबले आहे. पाथर्डी तालुयात ३५ अतिरिक्त शिक्षकांच्या गोंधळामुळे तेथे तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे समायोजन थांबल्याचे कळते; परंतु पारनेर तालुयात मात्र समायोजन हे हंगे येथील दोन अतिरिक्त शिक्षकांना कुठे समायोजित करायचे, या प्रश्नावरून थांबल्याचे समजते.
याबाबत सविस्तर माहिती घेतली असता, हंगा शाळेची पटसंख्या मागील वर्षी कमी असल्यामुळे दोन शिक्षक अतिरिक्त झाले. यावर्षीच्या प्रक्रियेमध्ये या शिक्षकांचे समायोजन दुसर्या शाळेमध्ये होणे गरजेचे होते. तसा नियमही आहे. नियमानुसार दरवर्षी संच मान्यता घेतल्या जातात. जेवढा पट असेल तेवढे शिक्षक घेणे गरजेचे असते. चालू वर्षांमध्ये हंगा शाळेचा पट वाढला जरी असला तरी मागील वर्षातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून यावर्षी वाढलेल्या पटानुसार परत शिक्षक नेमणूक होणे किंवा दुसरीकडचे शिक्षक तेथे पाठवणे गरजेचे आहे. म्हणजेच समायोजन प्रक्रिया न थांबवता या शिक्षकांना तातडीने दुसरीकडे हलवून समायोजन प्रक्रिया पूर्ण करून घेणे नियमानुसार गरजेचे आहे.
असे झाले नाही तर या शिक्षकांचे पगार कोणत्या शाळेवर काढायचे याबाबत प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रशासन अडचणीत येण्याची शयता आहे. परंतु माझ्या गावातील शिक्षक हलवायचे नाहीत, असे आदेश हंगा येथून थेट प्रशासनाला देऊन समायोजन प्रक्रियेत खोडा घातला गेल्याचे समजते. कुणी दिले हे आदेश? कायदेशीर प्रक्रियेमध्ये खोडा घालण्याची ही कोणती विकास प्रक्रिया? हे आदेश थेट हंगा गावातून कुणी दिले? याबाबत मात्र अधिकारी मौन बाळगतात.
त्रास दिला जाईल, या भितीने याला कुणी वाचा फोडायची हा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. शिक्षण विभागात काम करायचे तर ‘हंगेश्वर’ प्रसन्न करून घ्यावाच लागतो, अशीही चर्चा आहे.पारनेर तालुका पंचायत समितीला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. असे असताना हा चेंडू जिल्हा परिषदेकडे टोलवला आहे. जिल्हा परिषदेने याबाबत शिक्षण संचालकांचा अभिप्राय मागवल्याचे समजते. वास्तविक नियमानुसार प्रशासनाने कामकाज करणे गरजेचे आहे. परंतु ‘हंगेश्वरां’च्या मर्जीसाठी आणि इच्छेसाठी या प्रक्रियेमध्ये खोडा घालून इतर शिक्षकांचा खोळंबा करून ठेवला आहे. संपूर्ण तालुयाची समायोजन प्रक्रिया यामुळे वेठीस धरली गेली आहे.
काही ठिकाणावरून ग्रामसभेचे ठराव तसेच सरपंचांचे समायोजन प्रक्रिये संदर्भात तक्रारी असल्यामुळे ही प्रक्रिया लांबली. सोमवारपर्यंत आम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. याबाबतच्या सगळ्या तक्रारींचं निरसन झालेले आहे.
– दयानंद पवार, बीडिओ पारनेर.
गटशिक्षणाधिकार्यांचे हंगा दर्शन
पारनेर तालुयात नवीन आलेल्या गटशिक्षणाधिकारी मॅडम हजर होताच अगोदर हंगा दर्शनासाठी गेल्याचे सांगण्यात येते. अर्थात हंग्याला हंगेश्वराच्या दर्शनाला गेल्या की आणखी कुठे, याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही. एका आठवड्यात गटशिक्षणाधिकारी किमान तीन वेळा हंगा वारी झाल्याचेही सांगण्यात येते.
हंग्याचा आदेशच अंतिम!
जोपर्यंत हंगे येथून आदेश येत नाही तोपर्यंत समायोजन प्रक्रिया कोणीही राबवू शकत नाही. हंग्याचा आदेशच पारनेर तालुयातील प्रशासनाला शेवटचा आदेश असतो, अशी चर्चा तालुयातील शिक्षकांत आहे.