अहमदनगर | नगर सह्याद्री-
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नीलेश लंके यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील येत्या मंगळवारी (दि. २३) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले, अशी माहिती नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर उपस्थित होते. भालसिंग म्हणाले, की नगर दक्षिण मतदारसंघात भारतीय जनता पार्टीन प्रचाराचे तगडे नियोजन केले आहे. वॉरिअर्स, बुथप्रमुख, गणप्रमुख, गटप्रमुखांच्या बैठका घेऊन घरोघरी प्रचार सुरू असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणनिहाय खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मेळावे सुरू आहेत. २० व २१ एप्रिल रोजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारसभा सहा विधानसभा मतदारसंघामध्ये होतील. त्या दोन दिवसांत सहा बैठकाही होणार असल्याचे ते म्हणाले.
सभांचे तगडे नियोजन देशात भाजपाने ४०० पेक्षा अधिक जागा जिंकायचा संकल्प केला आहे. त्यानुसार वरिष्ठ नेत्यांच्या सभांचे तगडे नियोजन करण्यात आले आहे. तसेच खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे.