जुने आरटीओ ऑफिस रस्ता काँक्रिटीकरण कामाची पाहणी
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
रस्ता काँक्रिटीकरणाचे कामे खोदून करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामे करीत असताना अडचण निर्माण होत असेल पण दोन महिने त्रास सहन करा पुढील अनेक वर्ष त्रास होणार नाही. तरी नगर शहराच्या ( Nagara city ) विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती मी करत आहे. आपण सर्वजण मिळून विकासकामांतून शहराचा काय पालट करू असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप ( MLA Sangram Jagtap) यांनी केले.
शहरातील जुने आरटीओ ऑफिस रस्ता काँक्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, ठेकेदार एजन्सी आदींसह मोठ्या संख्येने अन्य नागरिक उपस्थित होते. शहरातील डांबरीकरणाचे रस्ते पावसाच्या पाण्यामुळे वारंवार खराब होऊन मोठमोठे खड्डे पडले जायचे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यांचा कायमस्वरूपी चा प्रश्न मार्गी लागावा यासाठी महायुती सरकारकडे गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला. त्यामुळे डीपी रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला.
शहरातील सर्वच भागांत रस्त्याची कामे सुरू असून जुने आरटीओ ऑफिस रस्ता अत्यंत खराब झाला होता. या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. पुढील २० वर्षांचे नियोजन करून कामे सुरू असून काम करीत असताना विविध अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये विजेचे खांब, पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन, जुन्या गटारी आहेत. त्या स्थलांतरित करण्यासाठी वेळ लागत आहे. याचा नागरिकांनी विचार करावा असेही आमदार जगताप म्हणाले.