spot_img
अहमदनगरबारांपैकी आठ जागांवर दिसणार पवारांची ‘पॉवर’!

बारांपैकी आठ जागांवर दिसणार पवारांची ‘पॉवर’!

spot_img

अकोलेत पिचड | साईबाबांच्या साक्षीने शिर्डीत विखेंना शह देणार आणि कोल्हेंना चुचकारणार | ढाकणे, जगताप, कोतकर, लंके, तनपुरेंसाठी रणशिंग फुंकणार

सारिपाट | शिवाजी शिर्के:-
पितृपक्षात काहीच शुभ कार्य करायचे नसतात असं मानलं जातं. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कायमच अशा रुढीपरंपरा यांना छेद दिल्याचं इतिहास सांगत आला आहे. निवडणकू तोंडावर आली असताना काकणभर देखील मागे राहायचे नाही आणि आपला स्ट्राईक रेट सर्वाधिक कसा राहील यासाठी धडपड करणार्‍या वयाची अंशी पार केलेल्या तरुण नेत्याने लोकसभेत दाखवून दिले. येणारी विधानसभा निवडणूक त्याला अपवाद राहूच शकत नाही. जागा वाटपाच्या चर्चा चालू असताना आपल्या पक्षाचे उमेदवार अंतिम करणे आणि त्यांना कामाला लावणे यात पवार सध्यातरी आघाडीवर दिसत आहेत. दोन दिवसांच्या दौर्‍यावर येत असलेल्या पवारांनी पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी अकोल्यात लँड होत असतानाच पिचडांना गळाला लावले आहे. दोन दिवसात अंशी पार केलेला हा तरुण नेता कोणाकोणाला गळाला लावतो याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. पहिल्या दिवशी पवार हे अकोल्यातून आपल्या दौर्‍यास प्रारंभ करतील. त्यानंतर ते शेवगावकडे रवाना होतील. शेवगावमधील सभा संपवून ते श्रीगोंद्यात दाखल होतील. त्यांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानंतर ते नगर शहरात दाखल होतील. नगरमध्ये त्यांचा मुक्काम असेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर ते शिर्डीकडे रवाना होतील. साईबाबांचे दर्शन घेऊन ते दुपारी राहुरीत येतील आणि त्यानंतर ते पारनेर तालुक्यातील निघोज येथे जाहीर सभा घेतील.

दोन दिवसांच्या पवार यांचा हा दौरा म्हणजे त्या- त्या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा नारळ वाढविण्याचाच असणार! स्ट्राईक रेट वाढवताना नगर जिल्हा आपल्या विचारांचा असल्याचे ते दाखवून देण्यास सज्ज झाल्याचे मानले जाते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी विखे पाटलांना चेकमेट केले. नीलेश लंके यांना उमेदवारी देऊन ही निर्णायक लढाई लंके यांनी जिंकली असली तरी हा विजय पवार यांचाच मानलो जातो. यावेळी त्यांनी संपूर्ण दौर्‍यात नगरमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर पुन्हा शिर्डी दर्शन हा दौरा तयार केला आहे.

वास्तविक पाहता दर्शन हे निमित्त मानले जाते. विखे पाटलांच्या शिर्डीत पवार फक्त दर्शन घेतील आणि माघारी फिरतील असे होणार नाही. एकूणच हा दौरा मोठी साखर पेरणी करणारा ठरणार आणि महाविकास आघाडीत नगर जिल्ह्यातील बारापैकी अकोले, शेवगाव, श्रीगोंदा, नगर शहर, राहुरी आणि पारनेर या सहा विधानसभा मतदारसंघातील आपल्या वाट्याच्या मतदारसंघांचा खुटा अधिक बळकट करतील. जोडीला कोपरगाव देखील असणार आहेच. कर्जत-जामखेड स्वत:चा पुतण्या आ. रोहीत पवार यांच्यासाठी असणारच! उर्वरीत चारपैकी नेवासा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाचे शंकरराव गडाख, संगमनेर आणि श्रीरामपूर काँग्रेसकडे असणार आहे. शिर्डीत तोडीसतोड उमेदवार देण्यासाठीची चाचपणी होणार आणि त्याठिकाणी थोरातांशी चर्चा करून उमेदवार ठरणार हे नक्की!

तुतारी घेण्यास सज्ज झाले वैभव पिचड
बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपासोबत गेलेले मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड हे राज्यातील सत्तांतरानंतर मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. सरकार भाजपाचे असले तरी पिचड यांना दुय्यम वागणूक मिळत आहेत. अजित पवार समर्थक किरण लहामटे यांची येथील उमेदवारी अंतिम असल्याने व महायुती एकत्रीत लढणार असल्याचे येथून पिचड यांना उमेदवारी मिळणार नाही. थांबलो तर संपलो, यानुसार पिचड आता थांबण्याच्या मुडमध्ये नाहीत. त्यामुळेच त्यांनी सिल्व्हर ओक गाठले आणि तुतारी हाती घेण्याची तयारी केली. आता तेच वैभव पिचड हे शरद पवार यांचे स्वागत करण्यासाठी भंडारदर्‍यात दिसणार आहेत.

संदीप कोतकरांच्या नावाची चर्चा; पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
नगर शहरात विद्यमान आ. संग्राम जगताप हे अजित पवार गटात आहेत. ही जागा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडेच राहणार आहे. शिवसेना दावेदार असली तरी त्यांच्याकडे मोठा जनाधार असणारा उमेदवार आज तरी दिसायला तयार नाही. माजी महापौर संदिप कोतकर यांनी निवडणुकीत उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कोतकर हे जयंत पाटील यांच्या माध्यमातून संपर्कात असल्याची चर्चा असली तरी स्वत: पवार यांनी या चर्चेला दुजोरा दिला नसल्याचे बोलले जाते. मात्र, पवार यांची पसंती संदीप कोतकर यांनाच असणार असल्याची चर्चा झडत आहे. नगर मुक्कामी पवार हे मविआतील अनेकांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या उपस्थितीत टीळक रस्त्यावर होणारी जाहीर सभा लक्षवेधी ठरणार आहे. याच सभेत कोतकर यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन होते की वेगळी भूमिका घेतली जाते हेही स्पष्ट होणार आहे.

शेवगावच्या पिचवर ढाकणेंसाठी बॅटिंग; घुलेंची सावध भूमिका!
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर घुले बंधू आपल्यासोबत येतील असे शरद पवार यांना अपेक्षीत होते. जयंत पाटील आणि घुले यांच्यातील नातेसंबंध पाहता तसे होईल असे वाटत असताना प्रत्यक्षात घुले बंधूंनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात विद्यमान भाजपा आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात आता बर्‍यापैकी लाट निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपासूनच केदारेश्वरचे प्रताप ढाकणे यांनी रणशिंग फुंकलेय! लोकसभा निवडणुकीत स्वत: उमेदवार असल्यागत अत्यंत आक्रमकपणे त्यांनी निवडणूक केली. नीलेश लंके यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यात ढाकणे यांनी मोठे योगदान दिले. त्याच ढाकणे यांच्या प्रचाराचा नारळ स्वत: शरद पवार हे शेवगावमध्ये जाहीर सभा घेऊन वाढवणार आहेत. शेवगावच्या पिचवर बॅटींग करताना पवार हे घुले बंधुंबद्दल काय भूमिका घेतात याकडे सार्‍यांच्याच नजरा लागल्या आहेत.

शिर्डीत विखे-काळेंसाठीचा ‘शिकारी’ अंतिम होणार!
नगरची जाहीर सभा संपल्यानंतर पवार हे शिर्डीकडे रवाना होणार आहेत. देवदर्शन करुन ते पुन्हा राहुरीकडे येतील. मात्र, फक्त देवदर्शन करुन माघारी फिरतील ते शरद पवार नक्कीच नाहीत! कोपरगावमध्ये विवेक कोल्हे हे पवार यांच्या संपर्कात आहेत. महायुतीत ही जागा अजित पवार गटासाठी गेल्यात जमा आहे. त्यामुळे भाजपाकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे विवेक कोल्हे यांनी हेरले आहे. त्यातूनच त्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्याकडूनही त्यांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. विवेक कोल्हे हे साईबाबांच्या दर्शनबारीत शरद पवार यांच्या हाताला धरुन दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. मात्र, त्याहीपेक्षा या शिर्डीत शरद पवार हे शिर्डीत विखे पाटलांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा याची चाचपणी करणार हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही. घोगरेताई या येथील उमेदवार समजल्या जात आहेत. त्यांची उमेदवारी काँग्रेसकडून असणार की पवार गटाची याचा निर्णय बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविला जाऊ शकतो. म्हणजेच पवार हे शिर्डीत येऊन आषुतोष काळे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधातील रणनिती ठरवून राहुरीकडे रवाना होणार आहेत.

राहुल जगताप यांच्या उमेदवारीची घोषणा होणार!
श्रीगोंदा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे शरद पवार यांनी मागील आठवड्यात स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि उमेदवार जाहीर करतील असंही त्यांनी सांगितले. मात्र, जागा राष्ट्रवादीची असल्याचे सांगत येथून राहुल जगताप हेच उमेदवार असल्याचे संकेत त्यांनी बारामती मुक्कामी कार्यकर्त्यांना दिले. मागील पाच वर्षात आमदारकी नसतानाही राहुल जगताप हे शरद पवार यांच्यासोबत राहिले. पक्षफुटीनंतरही त्यांनी पवार यांची साथ सोडली नाही. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे दुसरा प्रबळ दावेदार नाही. मविआतील अन्य पक्षांकडे असणार्‍या इच्छुकांच्या जनाधारापेक्षा राहुल जगताप यांचा जनाधार शरद पवार यांनी टिपला असल्याचे बोलले जात असल्याने राहुल जगताप यांच्या उमेदवारीची घोषणा श्रीगोंदा मुक्कामी होऊ शकते.

पारनेरमध्ये राणीताई लंके हा सक्षम पर्याय, उमेदवारही त्याच!
महिलांच्या आरोग्य तपासणीच्या निमित्ताने शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून मतदारसंघात रवाना केलेला तब्बल एक कोटी रुपये खर्चाचा आरोग्यरथ, त्या रथावर खासदार निलेश लंके यांचा चारही बाजूने असणारा फोटो आणि जोडीला राणीताई लंके यांचाही फोटो! शरद पवार यांनी मार्गस्थ केलेला हा रथ आता गावागावात फिरत आहे आणि आरोग्य जागृती करत आहे. राणीताई लंके यांच्या फोटोसह सुमारे एक कोटी रुपये खर्चाचा हा रथ आणि त्याला पवारांनी दाखवलेला हिरवा सिग्नल हेच राणीताई लंके यांच्या उमेदवारीचे संकेत आहेत. राणीताई लंके याच या मतदारसंघात सक्षम उमेदवार असल्याचे आजतरी दिसून येत आहे. मविआतील अन्य घटक पक्षात इच्छुक असले तरी त्यांचा आवाका किती हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळेच राहुरीतील सभा संपल्यानंतर पवार हे पुण्याकडे रवाना होण्याआधी निघोज येथील जाहीर सभेत राणाताई लंके यांच्या कामाचे कौतुक करताना दिसल्यास आश्चर्य वाटू नये.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...