अहमदनगर । नगर सहयाद्री
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थीनीने १४ जून रोजी सकाळी टाकळीमिया परिसरात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रोड रोमिओंच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील विद्यार्थीनीने नुकतेच ११ वी वर्गात प्रवेश घेऊन महाविद्यालयीन शिक्षण सुरु केले होते. ती क्लासला जात येत असताना काही रोड रोमिओ तिची छेड काढत होते. याबाबत तिने आईला सांगितले होते. त्यावेळी तिच्या आईने सदर रोड रोमिओंना भेटून माझ्या मुलीची छेडछाड करू नका, तिला त्रास देऊ नका, तिला परत फोन करू नका, अशी समज दिली होती. त्यानंतरही रोड रोमिओंच्या छेडछाडीचा त्रास सुरुच होता. ती या त्रासाला पूर्णपणे कंटाळली होती. १४ जून रोजी सकाळी जागृती ही क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली आणि तालुक्यातील टाकळीमिया शिवारातील रेल्वे बोगद्याजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थीनीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून देवळाली प्रवरा येथील दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच राहुरी पोलीस पथकाने दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.