जलजीवनचे कामे निकृष्ट । पाण्यासाठी महिलांना पायपीट
अहिल्यानगर । नगर सहयाद्री: –
मार्च महिन्यातच राज्य पाणी टंचाईकडे वाटचाल करतंय. अनेक जिल्ह्यात आतापासून टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. आता पाणीटंचाईच्या झळा अहिल्यानगरला बसायला सुरवात झाली आहे. नगरच्या १२ गावांमध्ये मार्च महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. तर लाखो रुपयांचे जलजीवन मिशनचे कामे निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिक करत आहे. तर काही ठिकाणी पाणी ट्रॅकर सुरु करण्याची मागणी केली जात आहे.
मार्च महिन्याच्या सुरवातीलाच काही गावामध्ये पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. नगर तालुक्यातील बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, नारायण डोह, मदडगाव, बालेवाडी, सांडवे, हिवरे झरे आणि जेऊर गावच्या आजूबाजूच्या वाड्या- वस्त्या अशा बारा गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर मदडगावात पाण्यासाठी महिलांना १४ किलोमीटर अंतरावर पायपीट करत वणवण करावी लागत आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.
वापरण्याचे पाणी हे एका तळ्यातून आणण्यात येत आहे. मात्र त्याचा दर्जा अतिशय खराब असल्याने ते वापरण्याच्याही लायकीचे नाही तर पिण्यास देखील योग्य नसल्याचे सांगितले जात आहे. तर काही गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे झालेली आहेत. मात्र ती अतिशय निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप करत शासनाचे कोट्यवधी रुपये यात वाया गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे दरवर्षी या गावाला पाण्यासाठी झगडावे लागत आहे. आता गावांसाठी पाण्याचे ट्रॅकर सुरु करावे तसेच ट्रॅकर मंजुरीची प्रक्रिया वेगाने करावी अशी मागणी होऊ लागली आहे.