अहमदनगर। नगर सहयाद्री
येथील नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थापन केलेल्या एसआयटी पथकाचे प्रमुख म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे असणार असून यात तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर, दोन पोलीस निरीक्षक व पाच पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. एसआयटी पथक स्थापन झाल्याने अर्बन फसवणुकीचा तपास करण्यात गती येणार आहे.
बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत याचा तपास सुरू आहे. बँकेच्या सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट झाले असून घोटाळ्याचा आकडा २९१ कोटींवर गेला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुनिया व प्रदीप जगन्नाथ पाटील या दोघांना अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (दि. २२) संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.
फसवणूक प्रकरणात संबंध असलेल्या सहा जणांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने नोटीसा दिल्या होत्या. ते हजर न झाल्याने त्यांना पुन्हा नोटीसा काढण्यात आल्या होत्या. तरीही ते हजर न झाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आदेश दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेकडूनही नोटीस देणार्यांचा शोध सुरू आहे. या नोटीसा देण्यामध्ये फक्त बँकेचे अधिकारी असल्याची माहिती असून यामध्ये कोणत्याही संचालकाचा समावेश नसल्याचे समजते.
मर्दाला वर्ग करा
अहमदनगर शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणी अटकेत असलेला सीए विजय मर्दा याचा अर्बन बँक फसवणूक प्रकरणात सहभाग असल्याने त्याला अर्बन फसवणुकीच्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्याबाबत फिर्यादी राजेंद्र गांधी यांनी पोलिसांना अर्ज दिला होता. पोलिसांनी त्याला अर्बनच्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले नसल्याने फिर्यादी गांधी यांनी मर्दाच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना आक्षेप घेतला होता. तसा अर्ज देखील त्यांनी न्यायालयात दिला होता. त्यावर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.