अहिल्यानगर । नगर सहयाद्री: –
नगर अर्बन (मल्टीस्टेट) को-ऑप. बँक (अहमदनगर) अहिल्यानगर ही नगर जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची व व्यापाऱ्यांची हक्काची बँक होती. 100 वर्षांच्या या बँकेवर काहींनी ताबा मारून बँकेतील सत्ता हस्तगत केली. बँक ताब्यात आल्यानंतर स्वतःसाठी व स्वतः च्या नजीकच्या लोकांसाठी बँकेत घोटाळे सुरु केले. या घोटाळ्यांमध्ये बँकेतील गोरगरीब जनतेचा पैसा लुटला व बँक बंद पाडली. बँकेत घोटाळा करणाऱ्या 105 आरोपींची नावे व त्यांची संपूर्ण माहिती पोलीस प्रशासनाकडे आहे. तरी या सर्व आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी बँकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगर अर्बन (मल्टीस्टेट) को-ऑप. बँकेत 291 कोटींचा आर्थिक घोटाळा झालेला आहे. भाजपचे माजी खासदार स्व. दिलीप मनसुखलाल गांधी यांच्या काळात ते चेअरमन असताना त्यांनी त्यांच्या संचालक मंडळासोबत केलेला बँकेचा आर्थिक घोटाळा जगजाहीर आहे. यात बँकेचे काही वरिष्ठ अधिकारीही सहभागी आहेत. आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. अर्बन बँकेत घोटाळा करणाऱ्या 105 आरोपींची नावे व त्यांची संपूर्ण माहिती पोलीस प्रशासनाकडे आहे.
तरी देखील महाराष्ट्र पोलीस व अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासन घोटाळा करणाऱ्या आरोपींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत. पोलीस प्रशासनावर देखील भाजप वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा व सरकार मधील मंत्र्यांचा दबाव आहे म्हणून काही कारवाई करत नाहीत असा आरोप चोपडा यांनी केला आहे. तसेच गृह खातेही आपल्याकडेच आहे. त्यामुळे अर्बन बँकेत घोटाळा करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी बँक बचाव समिती व राजेंद्र चोपडा यांनी केली आहे.