अहिल्यानगर । नगर सहयाद्री
महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे अस्मानी संकट ओढावले आहे. पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. गत दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे.काल अकोले, पाथर्डी, शेवगाव, नेवाशाला अवकाळी पावसाने तडाखा दिला. पाथर्डीत काही भागात गारपीट झाली. नेवासा तालुक्यात वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला.
नगरसह राज्याच्या विविध भागात गेल्या आठ दिवसांपासून भाग बदलत अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने नगर जिल्ह्याला आज मंगळवार (दि.13) रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. दरम्यान, नेवासा तालुक्यातील इमामपूर येथे काल दि 12 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यात आकाशात विजांचा कडकडाट ऐकू येत होता. त्याचवेळी शेतात काम सुरू असलेल्या तरुण शेतकरी गणेश शिवाजी काळे (वय 34) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
इमामपूर गावातील पोपट जानकीराम काळे यांच्या शेतात विद्युत रोहित्र (डीपी) आहे. ते विद्युत रोहित्र जळाले होते. पण काल ते दुरुस्त करून बसविण्यात आल्यानंतर त्या रोहित्रावरून विद्युत पुरवठा करणार्या नवीन विद्युत तारा कामगार व शेतकर्यांच्या मदतीने ओढण्याचे काम सुरू होते. पण सायंकाळी साडेसहा वाजता काम सुरू असताना त्या परिसरात विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली. त्यामध्ये गणेश शिवाजी काळे (वय 34) या शेतकर्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.