पारनेर । नगर सहयाद्री
मान्सूनपूर्व पावसाने पारनेर तालुक्यात सोमवारी पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. रुई छत्रपती येथे वादळी वाऱ्यासह अर्धा तास गारपीट झाली, तर भाळवणी गावात सलग दुसऱ्या दिवशी कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. पारनेर शहरासह सुपा, हंगा, कान्हुर पठार, गोरेगाव, करंदी, टाकळी ढोकेश्वर आणि इतर अनेक गावांमध्ये सुमारे एक तास संततधार पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. या पावसामुळे दिवसभर जाणवणाऱ्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कांदा उत्पादक शेतकरी कांदा झाकण्यासाठी धावपळ करताना दिसले, तर आंबा आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत होता. दुपारी चारनंतर तालुक्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या आठवड्याभरापासून पारनेर तालुक्यातील पारनेर शहर, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी, हिवरे कोरडा, सुपा, राळेगणसिद्धी, पानोली, निघोज, वडझिरे, अळकुटी, तिखोल, विरोली, काकणेवाडी, सिद्धेश्वरवाडी, वासुंदे, वनकुटे, ढवळपुरी यासह अनेक गावांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाल्याने गावागावांत चर्चांना उधाण आले आहे. या पावसाने शेतीसह दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला आहे.
लग्न कार्यांवर अवकाळीचे संकट
21 ते 25 मे दरम्यान तालुक्यात अनेक लग्नांचे मुहूर्त असून, सलग पडणाऱ्या अवकाळी पावसाने लग्न कार्य असणाऱ्या कुटुंबीयांची धांदल उडाली आहे. ऐन लग्नाच्या हंगामात अवकाळी पावसाने लगीनघाईत अडथळा निर्माण केला आहे. परिणामी, अनेकांनी मंगल कार्यालयांना पसंती देत बाहेरील मंडपांऐवजी बंदिस्त जागांचा पर्याय निवडला आहे. या पावसामुळे लग्न कार्यांचे नियोजन करणाऱ्या मालकांची चांगलीच पंचायत झाली आहे.
वीजपुरवठा खंडित, गावे अंधारात
सोमवारी दुपारपासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने अनेक गावांमध्ये बत्ती गुल झाली आहे. वीज यंत्रणेवरही या पावसाचा परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत आहे. यामुळे ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागत आहे.