नाशिक । नगर सहयाद्री
लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्यावर येत आहेत. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा भव्य रोड शो आणि प्रचारसभा होणार आहे. मात्र या सभेच्या आधीच महायुतीला मोठा धक्का बसला असून मराठा समाजाकडून नाशिकसह दिंडोरी लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहेनाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजावर अन्याय करणार्या, मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा न देणार्यांना पाडण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांना पाठिंबा देत असल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.