मुंबई / नगर सह्याद्री –
राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणाची झाली आहे. सध्या काका(शरद पवार) पुतणे (अजित पवार) अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येण्यापासून ते अगदी शरद पवार यांनी व्यक्त केलेले मत. अशा अनेक बाबींवर चर्चा होत आहे. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी केलेले विधान आगामी काळातील राजकाणात घडणाऱ्या घडोमोडींची शक्यता अधोरेखित करत असल्याचे सांगितले जात आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत वा काही पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक संवादामध्ये शरद पवारांनी व्यक्त केलेले मतं बरंच काही सांगून गेले आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
शरद पवारांचे विधान
नुकतीच शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसविषयी केलेले विधान अत्यंत बोलके आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, हा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा. मी या प्रक्रियेत नाही. दोन्ही बाजूचे प्रतिनिधी एकाच विचारांचे आहेत. सध्या आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत. त्यात काही जण अजित पवारांसोबत एकत्र येण्याचे मत मांडत आहेत. परंतु इंडिया आघाडी सध्या सक्रिय नाही. त्यामुळे आम्हाला संघटनेसोबत पक्ष उभा करावा लागणार आहे. युवकांना सोबत घेऊन काम करावं लागणार आहे, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या या विधानावर टीव्ही न्यूज चॅनेवर चर्चांना महापूर आला. शरद पवार आणि अजित पवार आमने सामने आल्यानंतर ते एकत्रित येणार असल्याच्या चर्चा होतच असतात. पण आता या चर्चा अधिक होताना दिसत आहेत.
राजकीय गणित सेट करण्याचा प्रयत्न?
शरद पवार यांचे याच मुलाखतीमधील आणखी एक विधान कोट करण्याजोगे आहे. ते म्हणाले होते, “आम्ही वेगवेगळ्या पक्षात विभागलो गेलेला असलो तरी विचारांनी एकत्र आहोत. त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तरी आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही.” शरद पवारांनी केलेले विधान आगामी काळातील राजकीय गणितं सेट करण्याचा प्रयत्न तर नाही ना असा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
भेटीची सुरूवात
राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार खूप कमी वेळा समोरासमोर आले होते. त्यांच्यात दुरावा असल्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. उदाहण द्यायचे झाल्यास मंचावर अमूक कार्यक्रम असताना दोघांनी एकमेकांकडे पाहणे टाळले, अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अजित पवार आणि शरद पवार यांची खऱ्या अर्थाने भेटीचा योग आला. त्याला कारण होतं, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्यासोबत झालेला साखरपुडा. या साखरपुडा कार्यक्रमाला स्वतः शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. या साखरपुडा कार्यक्रमातील फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत अजित पवार हे शरद पवार यांना कार्यक्रमात आसनाकडे घेऊन जाताना दिसले. या देहेबोलीतून राजकारण आणि कुटुंबीय या दोन गोष्टी वेगळ्या स्थरावर आहेत असे अजित पवार यांनी अधोरेखित केले.
अजित दादांनी काकांचे गोडवे गायले….
एका कार्यक्रमात आई वडील आणि चुलत्याच्या कृपेने आमचं चागलं चाललंय असे विधान अजित पवारांनी करून राजकारणात शरद पवारांबद्दल आदरयुक्त भावना व्यक्त केली. त्यांच्या विधानाची देखील चर्चा मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावर महायुतीत आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया समोर आल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात १० आमदार आहेत. यातील काही आमदारांचा सूर अजित पवारसोबत जाण्याचा असल्याची माहिती माध्यमांमध्ये आहे. तर दुसरा गट शरद पवारसोबत म्हणजेच महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
कामाला लागण्याचा आदेश
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आमदारांची बैठक नुकतीच पार पडली. यासंबंधीची पोस्ट अजित पवार यांनी त्यांच्या एक्स अकाउटवरून शेअर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री महोदय, खासदार, आमदार तसंच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्वांशी सविस्तर संवाद साधला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तात्काळ तयारीला लागण्याचे निर्देश दिले. पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. युवक-युवती, शेतकरी-कष्टकरी तसंच समाजातील सर्व घटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या.
अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागण्याची शक्यता असल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळातील पक्षातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने शरद पवारांकडून वक्तव्य आली असतील अशी माहिती देखील अजित पवारांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला राम राम करण्याची हालचाल सुरू असेल म्हणूनच शरद पवारांकडून पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सुतोवाच केले असतील,’ असं अजित पवार आमदारांच्या बैठकीमध्ये म्हणाले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांचा खोचक टोला?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी खोचक टोला लगावला आहे. ‘अशा प्रकारच्या चर्चा पवार कुटुंबाबाबत नेहमीच होतात. पण पुढे जाऊन त्या प्रत्यक्षात येत नाहीत. आताही सारखी चर्चा चालली आहे. अजितदादा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे. जयंत पाटील वगैरे हे सर्व जण असे लांब उभे असतात. काय तुम्ही निर्णय घेणार ते सांगा. हे तीन जण मिळून पक्ष होता. रोहित पवार वगैरे हे देखील सर्वजण लांबच आहेत. या तीन जणांच्या एकत्रीकरणाची अशी चर्चा खूप वेळा होते, पण गेल्या अडीच ते तीन वर्षांमध्ये ती काय अजून प्रत्यक्षात आलेली नाहीये,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येतायेत म्हणून दोन्ही पवारांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली आहे का? असा प्रश्नही यावेळी चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देणं त्यांनी टाळलं, माहीत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.