अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगात फिरवायला सुरवात केली आहे. पोलिसांनी तत्कालीन संचालक मनेष साठे व अनिल काेठारी यांंना अटक केली होती. या दोघांनाही 2 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
पुढील तपासासाठी पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती मिळाली आहे. नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळाबाबत कोतवालीत गुन्हा दाखल आहे. बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी फिर्याद दिली होती.
आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करत आहेत. बँकेमधील सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट झाले असून त्याचा अहवालही मागील महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने याआधीच दोघांना अटक केली आहेच, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आता मनेष साठे व अनिल काेठारी या संचालकांना ताब्यात घेतले होते. त्यांना पोलीस कस्टडी मिळाली आहे. पोलिसांनी आता तत्कालीन संचालकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली असल्याने इतर संचालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही संचालक परार झाले असून अनेकांचे फोन स्विच ऑफ झाले आहेत अशी चर्चा सध्या कानावर येत आहे.
दरम्यान पोलिसांकडून कारवाई सुरु झाल्याने ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता आगामी काळात न्याय मिळेल अशी भावना ठेवीदार व्यक्त करत आहेत. हा तपास आता कोणत्या वळणावर जातो? आणखी कुणी यामध्ये अडकते का? आणखी संचालक अटक होतील का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.