श्रीरामपूर। नगर सहयाद्री-
तालुक्यात काही दिवसांपूर्वीच टाकळीभान रोडवर अज्ञात तरुणांनी शस्राचा धाक दाखवत ‘ट्रॅक्टर’ पळवला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील आरोपींना बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख, शकिल नजीर शेख, विशाल सुनील बर्डे, अक्षय श्रीराम जमघडे, सोहेल नसीर शेख , विवेक लक्ष्मण शिंदे असे आरोपी नावे असून साथीदार राहुल आहेर फरार आहे.
खोकर फाट्याजवळ किशोर धिरडे यांना चार ज्ञात तरुणांनी हत्याराचा धाक दाखवून त्यांना स्विफ्ट कारमध्ये बसवून त्यांचा ट्रॅक्टर चोरुन नेला होता. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच दुसऱ्या घटनेत दि. २२ फेब्रुवारी रोजी अरुण सिताराम पवार यांचा भानसहिवरे शिवार त्यांच्या ट्रॅक्टरला स्विफ्ट गाडी आडवी लावून फिर्यादीस मारहाण करुन त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर चोरुन नेला होता. त्यानंतर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील दोन्ही गुन्हे करण्याची पध्दत ही सारखीच असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदरचा गुन्ह्याचा तपास लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.
पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचत अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख, शकिल नजीर शेख, विशाल सुनील बर्डे, अक्षय श्रीराम जमघडे, सोहेल नसीर शेख, विवेक लक्ष्मण शिंदे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता वरील गुन्हे साथीदार राहुल आहेर यांच्या मदतीने केले असल्याचे सांगितले.