कर्जत । नगर सहयाद्री
सख्ख्या भावानं आपल्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. एवढेवर न थांबता जन्मदात्या आईला देखील मारहाण केल्याचा प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली असून उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. नितीन विकास काळे (वय २८) यांची हत्या करण्यात आली असून गणेश विकास काळे असे आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी: हिंगणगाव गावाच्या शिवारामध्ये भोसले वस्ती येथे अशोक गायकवाड यांच्या शेतातील गटनंबर ३८ मधील पडीक जमिनीवर गणेश काळे व नितीन विकास काळे हे पाल टाकून एकत्र राहत होते. ४ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता गणेश काळे हा नितीन काळे यास म्हणाला की, मी कामावर गेल्यावर माझ्या मुलाला मारहाण करतो, त्याच्यासोबत सतत भांडणे का करतो. यावरून आपसामध्ये वाद सुरू झाले.
वादाचे रूपांतर हाणामारीत कधी झाले हे समजलेच नाही. यावेळी लाकडी दांडक्याने गणेश काळे याने नितीन यास डोक्यात जोराने प्रहार केला. यात नितीन काळे हा मरण पावला. विशेष म्हणजे या दोन भावांमधील वाद सोडवताना त्यांची आई रिबीना विकास काळे या देखील यामध्ये जखमी झाल्या असून त्यांना नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कोहिनूर साहेबराव भोसले राहणार परिटवाडी यांच्या फिर्यादीवरून गणेश विकास काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.