अहमदनगर | नगर सह्याद्री
महापालिकेवर प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मनपा प्रशासनाकडून नगरविकास खात्याला लोकनियुक्त मंडळाची मुदत ३१ डिसेंबरला संपत असून, पुढील प्रक्रिया करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचीच नियुक्ती होणार की जिल्हाधिकार्यांकडे प्रशासकीय पदभार देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महापालिकेच्या लोकनियुक्त मंडळाची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. नागरिकांचा मागस वर्ग आरक्षण संदर्भात न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. बहुतांश जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये प्रशासकीय राज सुरू आहे. या निवडणुका कधी होतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे ३१ डिसेंबरनंतर येथील महापालिकेवर प्रशासक येणार, हे निश्चित आहे. त्या प्रक्रियेची तयारी म्हणून महापालिका प्रशासनाने नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र दिले आहे.
त्यात ३१ डिसेंबरला मुदत संपत असून, पुढील कार्यवाहीसंदर्भात प्रक्रिया करण्याची विनंती करण्यात आली आहे.
आतापर्यंत जेथे प्रशासक आहे, तेथे तेथील प्रमुख अधिकार्याकडेच पदभार सोपविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचा प्रशासक पदाचा भार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकेतील प्रशासक पदाचा कार्यभार आयुक्तांकडे सोपविण्यात आलेला आहे.
मात्र येथे नुकत्याच एका कार्यक्रमात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आपल्याकडे महापालिकेच्या प्रशासक पदाचा कार्यभार आल्यास काही गोष्टी मार्गी लावता येतील, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळे तेंव्हापासून नेमका प्रशासक कोण असेल, याकडेही शहराचे लक्ष लागले आहे.