अहमदनगर। नगर सहयाद्री-
स्थानिक गुन्हे शाखेने लूटमार करणारे दोघे जेरबंद केले आहेत. लहू वृद्धेश्वर काळे (वय १९, रा. शेवगाव), दिनेश उर्फ बल्याराम अंगद भोसले (वय २२, रा.कासारी, ता.आष्टी) अशी आरोपींची नावे आहेत. शेवगाव तालुयातील बोधेगाव येथून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ७० हजारांचे दागिने, ३० हजारांचे २ मोबाईल, ८० हजारांची युनिकॉन मोटार सायकल असा ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. विनोद जिजाबा भोसले व कानिफ उद्धव भोसले हे दोघे फरार आहेत.
अधिक माहिती अशी : १५ जानेवारी २०२४ रोजी वैष्णवी संकेत ठाणगे (वय २२, हल्ली रा. तळेगांव रोड, ढमढेरे शिक्रापूर) या त्यांच्या पतीसोबत दुचाकीवरून शिक्रापूर येथे जात असताना कौडगाव मधील जांब फाट्याजवळ तीन इसमांनी मोटार सायकलवर पाठीमागून येत १४ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असे हिसकावून चोरून नेले. याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना संबंधित आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोउपनि/सोपान गोरे, पोलीस अंमलदार संतोष लोढे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, संदीप चव्हाण, फुरकान शेख, संतोष खेरे, सागर ससाणे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे, चंद्रकांत कुसळकर व भरत बुधवंत यांचे पथक तयार करुन त्यांना याबाबत रवाना केले.
या पथकाने गुन्हा घडला त्या ठिकाणच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज पाहत, तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेतली. त्यांना हा गुन्हा वरील आरोपींनी केल्याचे समजले. बोधेगाव येथे जात पोलिसांनी वरील दोन आरोपीना ताब्यात घेतले. त्यांनी वरील फरार आरोपींसोबत हे कृत्य केल्याचे कबूल केले.