नाशिक। नगर सहयाद्री
राजकारणात टिकायचे असेल तर संयम हा महत्त्वाचा आहे. गेली १८ वर्ष अनेक चढउतार पाहिले. माझ्या कडेवरती माझीच पोरं खेळवायची आहेत. इतरांची नाही. राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणार्या माणसांची मोळी अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
मनसेच्या वर्धापन दिन मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, गेल्या १८ वर्षात अनेक चढउतार पाहिले, चढ कमी उतारच जास्त पाहिले. या अनेक चढउतारात तुम्ही माझ्यासोबत राहिला. यश तुम्हाला मिळवून देणारच, पण त्यासाठी संयम लागतो. माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत. राष्ट्रवादी पक्ष हा निवडून येणार्या माणसांची मोळी आहे. जे जे निवडून येतात त्यांची मोळी सोबत घेतात आणि हा माझा पक्ष आहे असं सांगतात. शरद पवार नेहमी हेच करत आलेत. आता वेगळे झाले तेही निवडून येणारेच आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच या महाराष्ट्रात जर खर्या अर्थाने पक्ष स्थापन झाला असेल तर जनसंघ, शिवसेना आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, यातील ९९ टक्के लोकांचा कधी राजकारणाशी संबंध नव्हता. अविनाश जाधव यासारखे असंख्य ज्यांचा राजकीय काही वारसा नव्हता ते समोर आले. आपली भूमिका स्वच्छ आणि प्रामाणिक होती. अनेक विषयांवर बोलायचंय, येत्या ९ एप्रिलला गुढी पाडवा मेळाव्यात बोलेन असंही राज ठाकरे यांनी सांगितले.
राजकारणात संयम महत्वाचा
आज पक्षाला १८ वर्ष पूर्ण होतायेत. तुम्हाला थोडासा राजकीय इतिहास सांगणे गरजेचे आहे. राजकारणात जर टिकायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे संयम..तुमच्या आजूबाजूला जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे यश तुम्हाला आता दिसतंय. नरेंद्र मोदींचे यश २०१४ सालचं असेल. पण ते संपूर्ण श्रेय त्या पक्षासाठी झटत असणार्या कार्यकर्त्यांचा आहे. १९५२ साली जनता पक्ष स्थापन झाला, १९८० साली भाजपा नामकरण झाले. ५२ सालापासून इतया लोकांनी मेहनत घेतलीय. इतकी वर्षाच्या मेहनतीनंतर मिळालेले हे यश आले.