सारिपाट / शिवाजी शिर्के-
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून नगर शहरातील उमेदवारीसाठीचा सर्वात प्रबळ असणारा पक्ष म्हणजे शिवसेना उबाठा गट. पंचवीस वर्षे स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या रूपाने अभेद्य असणारा सेनेचा गड दोन टर्म आमदार असणार्या संग्राम जगताप यांनी आश्चर्यकारकरित्या दहा वर्षांपूर्वी खेचून आणला. दुर्दैवाने कोरोना काळात राठोड यांच निधन झाल. मात्र त्यानंतर शिवसेनेत कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. नगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणार्या मात्र नगर तालुयासह दक्षिणेतील राजकारणामध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणार्या शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी कडवट शिवसैनिक म्हणून आपला दबदबा निर्माण केला. शहराची जागा शिवसेनेला सुटली नाही म्हणून संजय राऊतांवर सौदेबाजीचा गंभीर आरोप करत बंडखोरीचा एल्गार सामान्य शिवसैनिकांनी केला. त्यानिमित्ताने शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक नगरकरांना पाहायला मिळाला. शशिकांत गाडे यांनी त्यांचा अर्ज तांत्रिक कारणाने राहिल्याचे सांगूनही शिवसैनिकांना तो अर्ज राहिल असे वाटले होते. मात्र, गाडेंनी दुसर्या दिवशी अभिषेक कळमकर यांना पाठींबा दिला. गाडेंचं बंड शमलं अन् त्याच्याच जोडीने संपल्या त्या शिवसैनिकांच्या आशाही!
शिवसेना वाचविण्यासाठी बंडखोरीची घोषणा करत शशिकांत गाडे, भगवान फुलसौंदर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले. बाळासाहेब बोराटे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज माघारीच्या दिवशी शेवटच्या २५ मिनिटांत तहसील कार्यालयात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. १५ सेकंदांमुळे गाडे यांचा अर्ज तसाच राहिला आणि शहरात तिरंगी लढतीची चर्चा सुरू झाली. चोवीस तासानंतर गाडे यांनी माघार घेत अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकर यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यावर पडदा पडला. १५ सेकंदांमुळे अर्ज राहिल्याचे कारण सांगितले गेले. मात्र ती तांत्रिक चूक नव्हे तर शशिकांत गाडेंचे शिवसैनिकांच्या आग्रहाखातर बंडच होते. शहरातील शिवसेनेला गद्दारीच ग्रहण लागलेलं आहे. सेनेत राहून सेनेच्याच विरोधात काम करणारा एक मोठा गट आजही सक्रिय आहे. राठोड यांच्यानंतर शहरातील शिवसेना वाचविण्यासाठी लढू पाहणार्या गाडेंना अशाच काही तथाकथित स्वकीयांनीच चोवीस तासातच खिंडीत गाठलं. नियोजनबद्ध रित्या त्यांच्या मनोबलाच खच्चीकरण केलं. शेवटी नाईलाजास्तव गाडे यांना माघार घ्यावी लागली. अखेर बंड शमल. मात्र शहरात शेवटच्या घटका मोजत असलेल्या कट्टर शिवसैनिकांची शेवटची आशा देखील संपली. मविआतील शिवसेनेची फरफट आणि त्यातून निर्माण झालेली शिवसैनिकांची नाराजी यामुळे उमेदवार अभिषेक कळमकर यांची वाट देखील बिकट झाली. त्याच वेळी संग्राम जगताप यांनी भाजप, शिंदेसेनेला आपलेसे केले. महायुतीची एकी आणि मविआ आघाडीत बिघाडी जगतापांच्या पथ्यावर पडणार की काय हे आगामी काळच ठरवेल.
शिवसैनिक स्व.अनिलभैय्यांच्या पाठीशी अन् त्यांचा मुलगा राष्ट्रवादीच्या वाटेवर!
संपूर्ण जिल्ह्यात नगर शहर हा शिवसेनेचा एकमात्र गड असला तरी देखील जागा वाटपात ही जागा मिळाली नाही. (अर्थात नगरची जागा मिळावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् करामतीखोर राऊतांनी साधी मागणी देखील जागा वाटपाच्या बैठकीत नोंदविली नव्हती.) प्रा. गाडे यांनी सामान्य शिवसैनिकांच्या आग्रहाखातर सैनिकांनीच स्थापन केलेल्या स्व. अनिलभैय्या राठोड विचार मंचाच्या वतीने गड शाबूत राखण्यासाठी उमेदवारी करण्याची तयारी दाखवली. मात्र त्यांना तथाकथित स्वकीयांनीच घेरायला सुरुवात केली. राठोड यांचे सुपुत्र असणारे विक्रम राठोड हे वडिलांच्या नावाच्या मंचा सोबत राहण्या ऐवजी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी प्रचार करण्याच्या वल्गना करू लागले. गाडे यांनी अधिकृतपणे कळमकर यांना पाठिंबा जाहीर करण्यापूर्वीच कळमकर यांच्या समर्थनाच्या पोस्ट राठोड यांनी फेसबुकवरून व्हायरल करायला सुरुवात केली. ज्या प्रमुख शिलेदारांच्या भरवशावर गाडे पुढे सरकू पाहत होते त्यातील मोजकेच साथ देण्यासाठी शेवटपर्यंत ठाम राहिले. मात्र काहींनी हे बंड शमेल कसे यादृष्टीने व्युव्हरचना आखत गाडेंना जर्जर केले. ज्या स्व. राठोड यांच्या नावाच्या मंचाच्या वतीने गाडेंची पुढील संभाव्य घोडदौड होणार होती त्याच राठोड यांचा मुलगा असणार्या विक्रम यांनी मात्र वडिलांच्या नावाच्या मंचाला साथ देण्या पासून पाठ फिरवली.
पोरकटपणाचा विक्रम, शिवसैनिकांची पाठ
अर्ज दाखल करण्याच्या दिवशी विक्रम राठोड हे शिवसेना, काँग्रेस बंडखोर उमेदवारांसह राष्ट्रवादीच्या उमेदवारा समवेत देखील फोटोमध्ये झळकले. यातून विक्रम यांचा राजकीय पोरकटपणाच पाहायला मिळाला. वडिलांच्याच नावाच्या मंचाकडे विक्रम यांनी पाठ फिरवली खरी. मात्र त्यानंतर शिवसैनिकांनीच विक्रम यांच्याकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. म्हणूनच गाडे यांच्या माघारी नंतर दुसर्या दिवशी अभिषेक कळमकर यांचा शिवालयातून प्रचार सुरू करण्यासाठी शिवसैनिकांना विक्रम यांनी निरोप धाडले. मात्र, असे निरोप धाडून देखील शिवसैनिक जमलेच नाहीत. त्यामुळे प्रचाराचा शुभारंभ रद्द करण्याची नामुष्की विक्रम राठोड यांच्यावर ओढावली. शिवसेनेचे उरले सुरले बुरुज देखील यामुळे नजिकच्या काळात ढासळल्या नंतर शिवसेनचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असणार्या स्व. राठोड यांचे सुपुत्र विक्रम हे खा. निलेश लंके यांच्या माध्यमातून भविष्यात राष्ट्रवादीत दाखल झाले तर नगरकरांना नक्कीच आश्चर्य वाटणार नाही.
नगर शहरातून शिवसेनेला पुन्हा संधी नाहीच नाही!
सेना-भाजप युतीत जागा वाटपात ही जागा कायम पस्तीस वर्ष सेनेकडे राहिली. हा अनिल राठोड यांच्या लोकप्रिय नेतृत्वाचा करिष्माच होता. आता ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाने सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत सेनेकडून खेचून नेली. यातून २०२९ च्या निवडणुकीत ही जागा आता राष्ट्रवादीकडेच राहणार यावर देखील शिक्कामोर्तब झाले. यामुळे आता भविष्यात शिवसेनेच्या मशालीला विधानसभे करिता नगर शहरामध्ये पुन्हा कधीच जागा मिळणार नाही हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.
शिवसेनेकडून फुलसौंदर, बोराटे या ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण
विधानसभेची जोरदार तयारी करणार्या प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे या दोन शिवसैनिकांनी उमेदवारी मागितली होती. शहरामध्ये ओबीसी मतदारांची संख्या निर्णायक आहे. त्यातही माळी समाजाची मतदार संख्या प्रचंड मोठी आहे. लोकसभेला या ओबीसी चेहर्यांचा चांगलाच उपयोग लंके यांनी खुबीने करून घेतला. अनिल राठोड यांना कायम साथ देणार्या ओबीसी मतदार आणि या दोन्ही ओबीसी नेत्यांना मात्र डावलले जात असल्याने नाराजीचा सूर शहरातील ओबीसींमध्ये आहे. राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांना खासदार करण्यासाठी जीवाचे रान करणार्या या दोन्ही ओबीसी नेत्यांना लंके यांनी विधानसभेला उमेदवारी मिळवून देण्याचा शब्द दिल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात लंके यांनी ही जागा राष्ट्रवादीकडे ठेवत कळमकर यांच्या पारड्यात आपले वजन टाकले. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शिवसेनेसह फुलसौंदर, बोराटे या ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण होत असल्याची चर्चा झडू लागली आहे.
कर्जत-जामखेडमधील मराठा नेते म्हणतात….
सुपारीबाज म्हणणारे आता रामकृष्णहरी म्हणत असले तरी,
पवारांच्या नातवाचं पार्सल बारामतीला पाठविण्याची सुपारी घेतलीय!
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात तीन- चार महिन्यांपूर्वी मोठ्या गावांमध्ये सुपारीबाज असा मथळा असणारे निनावी फलक लावण्यात आले होते. हे फलक अत्यंत खुबीने आणि चतुराईने लावण्यात आले होते. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यातील काही मराठा नेत्यांना टोमणा मारणारे हे फलक होते. कर्जत शहरात एका फलकावर सुपारी आणि त्या सुपारीला घातलेली टोपी असे दाखविण्यात आले होते. कर्जतच्या राजकारणात अंबादास पिसाळ हे मोठं नाव आणि टोपी वापरणारेही ते बड्या नेत्यांपैकी एक! सुपारीचा फ्लेक्स अन् त्या सुपारीला टोपी घालणारे बोर्ड लावला गेल्याने तो पिसाळ यांच्याच विरोधात होता हे सांगण्यासाठी कोणाची गरज नव्हती. मात्र, तरीही त्यावेळी या सुपारीबाज फलकांविरोधात कोणी बालले नाही. आता त्याच फलकांवर रामकृष्णहरी असं वाक्य दिसत आहे. काही दिवसानंतर या फलकांवर तुतारी दिसणार हे नक्की! मात्र, हे असं होत असताना या दोन्ही तालुक्यातील प्रमुख नेत्यांना सुपारीबाज अशी उपाधी देणार्यामागे राहीत पवार यांचीच यंत्रणा होती हे आता लपून राहिलेले नाही. कर्जत- जामखेडमधील मराठा नेत्यांना नामोल्लेख टाळत सुपारीबाज अशी उपाधी देणार्या नातवाला घरी बसविण्याची सुपारी आता आम्ही घेतलीय, अशी उपरोधीक टीपणी आता केली जाऊ लागली आहे. पाच वर्षापूर्वी आम्ही तुमच्या सोबत होतो. त्यावेळी राम शिंदे आम्हाला सुपारीबाज म्हणाले नव्हते. मात्र, तुमच्या इशार्यावर आम्ही नाचलो नाही, बसलो नाही आणि उठलो नाही म्हणजे आम्ही सुपारीबाज ठरवले जात असू तर आम्हाला तुमचा हा उर्मट, हेकेखोर नातू नको, तुमच्या लाडक्या नातवाचं पार्सल आम्ही वीस तारखेला पॅकींग करून पाठवत असून ते तुम्हाला निकालाच्या दिवशी भेटेल असा टोला आता रोहित पवारांकडून दुखावलेलेे बहुतांश मराठा नेते लगावताना दिसत आहेत.
संजय राऊत प्रचाराला आले होते की अनुराधा नागवडेंना पाडायला!
सार्वजनिक ठिकाणी अथवा चारचौघात बोलताना काय पथ्य पाळावी लागतात आणि ती पथ्य पाळली नाही तर काय किंमत मोजावी लागते हे काल श्रीगोंद्यातील जाहीर सभेनंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना समजले असेलच! तसेही संजय राऊत हे शिवसेना वाढवायला निघालेत की संपवायला अशी शंका राज्यातील शिवसैनिकांना कायम येत असते. काल, श्रीगोंद्यातील सभेत त्यावर शिक्कामोर्तब झाले इतकेच! ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते हे आजारी आहेत. त्यांच्या आजारपणामुळेच त्यांनी उमेदवारी केली नाही हे सर्वश्रूत! मात्र, तरीही शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावर उपहासात्मक टिपणी केली. पाचपुते समर्थकांच्या ती जिव्हारी लागली. त्यातून पाचपुते समर्थकांनी रात्रीच चौकात उभे राहून राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारले. रात्री आणि आज दिवसभर त्याचे पडसाद उमटत राहिले. संजय राऊत यांचे हे वक्तव्य आता पाचपुते समर्थकांचे भांडवल ठरणार आहेत. याशिवाय आमच्याकडेही आता साखर सम्राट आल्याची टिपणी संजय राऊत यांनी केली. मात्र, ही टीपणी करून त्यांनी नागवडेंच्या मतांमध्ये वाढ केली की घट हेही समोर येणार आहे. नगर शहराची जागा शिवसेनेसाठी मागण्यासाठी तोंड न उघडणार्या संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात सभा घेतली असली तरी त्यांच्या फटकळ बोलण्याने बेरीज करणारी ठरण्याऐवजी वजाबाकी करणारीच ठरलीय!
नागवडेंनी भर सभेत कपाळावर हात मारुन घेतला तो यामुळेच तर नसेल ना?
नागवडेंच्या पाठींब्यावर आणि टेकूवर काष्टीसारख्या गावचं सरपंचपद मिळाल्यानंतर संजय राऊतांच्या कृपेने शिवसेनेत उपनेतेपद मिळालेल्या साजन पाचपुते यांनी काल अनुराधा नागवडे यांच्या सभेत आपले तारे तोडले. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे ते सख्खे पुतणे! सदाअण्णांचे चिरंजीव ही त्यांची दुसरी ओळख! नागवडेंच्या यंत्रणेने गर्दी जमवली अन् हीच गर्दी आपण जमा केली असल्यागत साजन पाचपुतेंनी भाषण ठोकले! त्यांचे वय वर्षे ३० च्या आसपास! श्रीगोंदा तालुका ४० वर्षे मागे गेला आणि तालुक्याचे वाटोळे झाल्याचं भाषण त्यांनी ठोकलं! वय वर्षे तीस पैकी निम्मे वय काष्टीच्या गल्लीबोळातच गेले. राहिलेल्या वयात बबनदादांच्या आशिर्वादाने मिरवण्यात गेले. दादांच्या कृपाशिर्वादाने साजनला साखर कारखाना, पाण्याचा अन् दुधाचा प्लँट मिळाला. सारं वैभव उभ राहण्यात बबनदादांचं योगदान किती हे संजय राऊतांपेक्षा समोर बसलेल्या श्रीगोंद्यातील जनतेला चांगलेच माहिती! तरीही साजनने भाषण असं ठोकलं की ते त्या गावचेच नाहीत! संजय राऊत खुष झाले असतीलही त्यांच्या भाषणावर! पण, श्रीगोंद्यातील समस्त मतदारांमध्ये चर्चा रंगलीय ती साजन पाचपुते याच्या कृतघ्नतेची! नागवडेंनी त्याच सभेत कपाळावर हात मारुन घेतला तो यामुळेच तर नसेल ना?
साहेब, तुमचा हा लाडका नातू आता तुम्हीच सांभाळा!
कर्जतची एमआयडीसी कोण, कशी मंजूर करतो हे बघतोच असे सात- आठ महिन्यांपूर्वी जाहीर आव्हान देत ललकारणार्या आमदार रोहीत पवार यांची आता चांगलीच गोची झाल्याचे दिसते. राज्यातील सत्तांतरानंतर राम शिंदे यांनी अत्यंत हुशारीने तालुक्यातील एमआयडीसीचा मुद्दा मार्गी लावला आणि जागेचा विषय देखील मार्गी लावला. मात्र, त्यावेळी रोहीत पवार यांनी त्यास विरोध केला आणि पाहून घेण्याची धमकी दिली होती. आता या निवडणुकीच्या निमित्ताने त्याच रोहीत पवार यांना पाहून घेण्याची भाषा मतदार करू लागलेत! पवार साहेब, आमच्या हिताआड येणारा तुमचा लाडका नातू आमच्या भागात चांगले उद्योग आणून आमच्या भागाचे नंदनवन करील असे वाटत होते. पण, तुमचा नातू आम्हाला धमकावत सुटलाय आणि पाहून घेण्याची भाषा करत आहे. साहेब, तुमचा हा लाडका नातू आता तुम्हीच सांभाळा! आमच्याकडे पाठवलेला हा नातू आम्हाला नकोय! अशा आशयाची पोस्ट सध्या कर्जत तालुक्यात फिरत आहे आणि तोच मूड संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहे.
संजय राऊतांचा व्यवहार हेरला अन् पवार समर्थकांसह शिवसैनिकांनी पाठ फिरवली
संजय राऊत यांची श्रीगोंद्यात सभा झाली असली तरी वादग्रस्त आणि नागवडेंच्या अडचणीत वाढ करणारीच ठरली. वास्तविक ही सभा पाच वर्षानंतर म्हणजेच २०२९ मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी साजन पाचपुते यांचे लाँचिंग करण्यासाठीचीच होती या चर्चेला पुष्टी देणारीच ठरली. ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ श्रीगोंद्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेकडे शरद पवार यांच्या समर्थकांनी सपशेल पाठ फिरवली. साजनच्याच इशार्यावर सारे काही होणार असेल तर आम्हाला तरी का गृहीत धरता असा सवाल त्याआधीच स्थानिक शिवसेना पदाधिकार्यांनी उपस्थित केला होता. जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे या सभेला उपस्थित होते. मात्र, ते फक्त शरीराने! शिवसैनिकांच्या मतांचा व्यवहार करत श्रीगोंद्याचा भाव वाढवून घेतल्याची खदखद सार्यांच्याच मनात असल्याचे या सभेच्या निमित्ताने दिसून आले. दुसरीकडे आमची हक्काची जागा नागवडेंना विकल्याचा राग आजही राष्ट्रवादी शरद पवार गटातील समर्थक पदाधिकारी- कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे या सभेतील अनुपस्थितीने दाखवून दिले.
विजयराव औटींना पुन्हा आठवला पारनेरमधील दहशत, दादागिरीचा मुद्दा!
पारनेरच्या राजकारणाची दिशा आणि दशा दिवसागणिक बदलत आहे. बाजार समिती आणि खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत नीलेश लंके यांच्याशिवाय तालुक्याला पर्याय नाही आणि बाह्यआक्रमण चालणार नाही असं सांगत गळ्यातगळे घालणार्या माजी आमदार विजय औटी यांना आता वेगळाच साक्षात्कार झाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात दादागिरी, उचलून फेकण्याचे आणि सुप्यातील औद्योगिक वसाहतीत दहशतीचे वातावरण असल्याचे ते आता सांगत सुटले आहेत. तालुका वेगळ्या विचाराचा असल्याचेही ते सांगत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत नीलेश लंके यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर काही वर्षे अज्ञातवासात ते गेले होते. बाजार समितीची निवडणूक लागताच याच औटींनी लंके यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. सुजय विखे यांना विरोध करत त्यांनी ही बाजार समिती लंके यांच्या ताब्यात दिली. त्यानंतर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतही ते लंके यांच्याच सोबत राहिले. मात्र, संघ विखे समर्थकांनी एकहाती ताब्यात घेतला. यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत औटी यांनी विखे यांना साथ दिली. तरीही लंके निवडून आले. आता विधानसभेच्या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार आहेत. गावागावात सभा घेताना ते तालुक्यातील दहशत, गुंडगिरी आदी मुद्दे मांडत आहेत. सुजय विखे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत हेच मुद्दे मांडले होते. मात्र, त्यावेळी औटी यांनी लंके यांचे समर्थन करत तालुक्यातील संपूर्ण शिवसेना नीलेश लंके यांच्या दावणीला बांधली. आता हेच औटी लंके व त्यांच्या समर्थकांच्या दादागिरी, गुंडगिरी आणि दहशतीचे मुद्दे मांडताना दिसत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत सवता सुभा ठेवला असता तर आज औटी यांना ही वेळच आली नसती असे कार्यकर्ते बोलू लागले आहेत.