विखे-लंके, लोखंडे-वाकचौरे यांची प्रतिष्ठा पणाला
अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर व शिर्डीत लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार हायहोल्टेल झाला. आरोप प्रत्यारोपांची राळ उठली. महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आमचा उमेदवार कसा कामाचा हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
दरम्यान अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होत असल्याने शनिवारी (दि. ११) प्रचाराच्या तोफा थंडावल्या. जाहीर सभा अन रॅली काढून प्रचाराची सांगता करण्यात आली. असे असले तरी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे व माजी आमदार नीलेश लंके यांची तर शिर्डी मतदारसंघात खासदार सदाशिव लोखंडे व भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अहमदनगर लोकसभा मदारसंघात महायुतीकडून खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अहमदनगर लोकसभा मतदासंघात २५ उमेदवार रिंगणातअसून विखे-लंके यांच्यात काटे की टक्कर पहावयास मिळत आहे. तसेच शिर्डीत महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे व महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहे वाकचौरे यांच्यात रंगतदार लढत होत आहे. या मतदारसंघात २० उमेदवार नशीब आजमावत आहेत.
विखे-लोखंडे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्या तोफा धडाडल्या. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खा. सुप्रिया सुळे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या तोफा धडाडल्या. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा झाली.
महायुती व महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांनी राष्ट्रीय, राज्यस्तरीय व स्थानिक प्रलंबित प्रश्नांवर प्रतिस्पर्धी पक्षांच्या नेत्यांवर जाहीर आरोप प्रत्यारोप करीत राजकीय वातावरण चांगलेच तापवले. शनिवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत उमेदवारांची जाहीर प्रचाराचे शेड्यूल पॅक केले होते. जाहीर प्रचार संपतेवेळी जोरदार हल्लाबोल करत विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांनी केले आहे.