अहमदनगर / नगर सह्याद्री : जिल्हा बँकेकडून पीककर्जाची वसुली सुरु आहे. परंतु नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून केवळ कर्ज मुददल रकमेची वसुली करण्याचे सांगितले आहे.
असे असले तरी जिल्हा बँकेकडून व्याजाच्या रकमेची आकारणी करण्यात येत असल्याचा आरोप करत ही व्याजाची वसुली थांबवावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले यांनी केली. तसे निवेदन त्यांनी उपनिबंधकांना दिले. यावेळी माजी सभापती रामदास भोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, माजी सभापती संदीप गुंड, पंचायत समितीचे माजी सदस्य गुलाब शिंदे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पीककर्जाची नियमित परतफेड करत असलेल्या शेतकऱ्यांकडून फक्त कर्ज मुददल रकमेची वसुली करणेबाबत पत्र देण्यात आलेले आहे. तथापी दुष्काळी परिस्थितीमध्येही जिल्हा बँकेकडून व्याजाच्या रकमेची आकारणी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असून उपरोक्त पत्राची जिल्हा बँकेकडून अंमलबजावणी झालेली नसल्याचे दिसून येते. तरी उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये शेतक-यांच्या पिककर्जाचे व्याज न घेण्याबबाबत पुन्हा आपल्या स्तरावरून योग्य तो आदेश निर्गमित करावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.