घरोघरी दिवाळी, मंदिरांवर रोषणाई | गावागावात, चौकाचौकात कार्यक्रम
अहमदनगर | नगर सह्याद्री
अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघे नगर शहर राममय झाले. सकाळपासूनच ठिकठिकाणी विविध कार्यक्रम सुरू झाले. सायंकाळी उशीरापर्यंत विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. राम नामाच्या जयघोषाने संपूर्ण अहमदनगर जिल्हा राममय झाला. दरम्यान घरोघरी दिवाळी साजरी करण्यात आली.
उपनगर शिवसेनेच्या वतीने सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौक येथे श्रीराम प्राण प्रतिष्ठापणानिम्मित सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र दरबार दर्शन सोहळा, महाआरती, कारसेवकांचा सत्कार, भजनी मंडळाचे भजन आदींचा समावेश होता. दिवसभर भजनी मंडळाच्या भजनाने प्रोफेसर चौक दुमदुमला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी अयोध्येमध्ये रामायणातील विविध प्रसंगावर आधारित देखावे तयार केले.
यापैकी १४ देखावे आयोध्येला रवाना झाले आहेत. त्यापैकी श्रीराम दरबार या देखाव्याची प्रतिकृती रामभक्तांच्या दर्शनासाठी प्रोफेसर कॉलनी चौक येथे तात्पुरत्या स्वरूपात स्थापित केली आहे. या देखाव्यात प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतामाई सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. तसेच रामभक्त हनुमान, लक्ष्मण भरत यांचेही शिल्प या देखाव्यात अंतर्भूत आहे. यावेळी कारसेवक मधुसुदन मुळे, श्रीराम येंडे, अॅड. अभय आगरकर या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, अशोक जोशी, बापू ठाणगे, प्रा. विशाल शितोळे, अनिकेत कराळे, चंद्रकांत उर्फ काका शेळके, योगेश गलांडे, श्री परदेशी आदी उपस्थित होते.
नगर शहरातील चौकाचौकात, घराघरात राम नामाचा जप करण्यात आला. विविध मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम करण्यात आले. नगर तालुक्यात वाळकी, गुंडेगाव, दहीगाव, पिंपळगाव माळवी, खडकी येथे मोठ्या उत्सहात कार्यक्रम पार पडले. वाळकी येथे प्रभू श्रीरामांना १५१ प्रकारचा नैवैद्य दाखविण्यात आला. वाळकीसह ठिकठिकाणी श्री राम चंद्रांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अयोध्येतील सोहळ्याचे लाईव्ह प्रेक्षेपण गावागावात स्क्रीन लावून दाखविण्यात आले.
देशमुख गल्लीतील श्रीराम मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अभिषेक, महाआरती, श्रीराम यज्ञ, हरिपाठ, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचा समावेश होता.